मुंबई - मुंबई - आज राज्यात रखडललेल्या विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप ( Resident Doctors Strike ) पुकारला आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला ( Impact on health system due to doctors strike ) आहे. तसेच, हा संपा चालूच राहिला तर यामाध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. संपावेळी अतिदक्षता विभाग वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मागील एका वर्षांपासून कित्येक बैठका होऊनही कोणतीच मागणी मान्य न झाल्याने डॉक्टरांनी हा संप सुरू केला आहे.
गिरीश महाजन यांना मागण्यांचे पत्र - यामध्ये सेन्ट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन ( Medical Education Minister Girish Mahajan ) यांना मागण्यांचे पत्र देण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी मागील एका वर्षापासून मंत्र्यांसोबतच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका होऊनही प्रतिसाद न दिल्याने निवासी डॉक्टरांनी आजपासून संपाचा हत्यार उगारले आहे. मुंबईतील केईएम , नायर, सायन, कूपर रुग्णालयात काम करणारे निवासी डॉक्टर्स या संपात सहभागी आहेत. या संपामध्ये राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, बीड, औरंगाबाद या जिल्हासह इतर अनेक जिल्ह्यातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. यामध्ये रुग्णांची गैरसोय होत आहे. मात्र, मागण्या पुर्ण होत नसल्याने डॉक्टर संपात सहभागी आहेत.
ठाणे जिल्हा - जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टर मार्ड संघटनेने पुकारलेल्या संपात सामील झाले. कळवा हॉस्पिटलमधील 117 डॉक्टर संपावर आहेत. विद्या वेतनसह विविध मागण्यांसाठी डॉक्टरांचा संप पुकारला आहे.
यवतमाळ जिल्हा - विविध मागण्यांसाठी आजपासून महाराष्ट्रातील मार्ड या संघटनेचे निवासी डॉक्टर संपावर आहेत. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालतील 130 डॉक्टरही संपावर आहेत. अत्यावश्यक सेवा विभाग सुरू ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे इतर रुग्ण सेवा विस्कळित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापुर्वी मार्डच्या डॉक्टरांनी आपल्या मागण्यांसाठी अनेकवेळा संप पुकारले. मात्र, शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले त्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांना संपाचं शस्त्र उगारवे लागले आहे.
बीड जिल्हा - राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर गेले आहेत. यामध्ये अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रोज पाच ते सात हजार रुग्ण तपासणीसाठी येत असतात. मात्र, या रुग्णसेवेमध्ये कार्यरत असणारे दीडशे डॉक्टर आजपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे सकाळपासूनच रुग्णांच्या चेकअप पासून इमर्जन्सी वार्ड पर्यंत सगळ्याच ठिकाणी पेशंटला वेटिंग करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
औरंगाबाद जिल्हा - जिल्ह्याती 300 पेक्षा अधिक निवासी डॉक्टर संपावर आहेत. औरंगाबादमध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन करण्यात आले आहे. अतिदक्षता विभाग वगळता इतर सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांची गैरसोय झाली आहे. मात्र, आमच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत आहे असे म्हणत डॉक्टर आपल्या संपाच्या निर्णयावर ठाम आहेत.
पुणे - आमच्या महत्त्वाच्या मूलभूत मागण्या त्वरित मान्य करा, अन्यथा आम्ही काम बंद आंदोलन करणार आसा इशारा दिल्यानंरत आज राज्यभरात सुरू असलेले निवासी डाक्टरांचे लोन पुण्यातही पाहायला मिळाले. आज राज्यातील हजारो निवासी डॉक्टर संपावर गेले आहे. पुण्यात ससून रुग्णालयातील तब्बल 600 मूल निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत अश्याच पद्धतीने बेमुदत बंद असणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
नागपूर जिल्हा - विविध मागण्यांसाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित झाल्याचे बघायला मिळत आहे. नागपूर शहरात दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत. त्यामध्ये साधारणतः 900 निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. मात्र, हे निवासी डॉक्टर संपावर गेल्यामुळे रुग्णसेवा बाधित झाली आहे.
निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर कार्यवाही सुरू - आपल्या विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. या संपात पालिका रुग्णालयातील २ हजार डॉक्टर उतरले आहेत. संपामध्ये सहभागी झालेल्या महापालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर कार्यवाही सुरू आहे. येत्या १५ दिवसांमध्ये या मागण्या पूर्ण होतील, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली. दोनच
मागण्या पालिकेशी संबधित मागण्या - महागाई भत्ता, सहयोगी प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे, वसतीगृहाच्या समस्या, मुंबई महानगरपालिकेकडून दर महिना मिळणारा प्रलंबित कोविड भत्ता या कारणांमुळे राज्यभरात आज पासून सात हजार निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, सायन, कूपर आदी रुग्णालयांमधील २ हजार डॉक्टर्स या संपात सहभागी झाले आहेत. यावर बोलताना यातील बहुतेक मागण्या या राज्य सरकारशी संबंधित आहेत. तर करोना काळात देण्यात येणारा कोविड भत्ता आणि वसतिगृह या दोनच मागण्या पालिकेशी सबंधित आहेत असे डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले.
१५ दिवसात प्रश्न सुटेल - पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या कोविड भत्त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. येत्या दोन तीन दिवसात यावर निर्णय होईल. तसेच वसतिगृहाची कामे सुरू आहेत. शिवडी येथील ॲकवर्थ रुग्णालय आणि कूपर रुग्णालयात नवे वसतिगृह सुरू होत आहे. नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहातील फर्निचरचे काम सुरू आहे. या वसतिगृहात नायर दंत रुग्णालयाचे डॉक्टर राहण्यासाठी आल्यावर ते सध्या राहत असलेल्या करीरोड येथील वसतिगृहात केईएममधील डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे येत्या १५ जानेवारीपर्यंत ४०० डॉक्टरांच्या राहण्याचा प्रश्न सुटेल. तसेच हाजीअली येथील वसतिगृहाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संजीव कुमार यांनी दिली.