मुंबई - मुंबई विद्यापीठाची फोर्ट येथील इमारत आणि परिसरात असलेल्या राजाबाई टॉवर आणि दिक्षांत सभागृहाला आता नवी झळाळी मिळणार आहे. विद्यापीठातील या हेरिटेज इमारतीच्या सुशोभिकरणासाठी राज्य सरकारकडून 200 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासंदर्भातील निर्णय बुधवारी उपमुख्ममंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत जाहीर केला.
हेही वाचा - राज्यमंत्री बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर; गुणवत्ता सुधारत नसेल तर शिक्षण विभागाची पुनर्रचना करा
उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार सुप्रिया सुळे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबई विद्यापीठाला 160 वर्षांचा ऐतिहासिक आणि गौरवशाली वारसा आहे. विद्यापीठाच्या इमारतीचें सौंदर्य आणि येथील इमारतीला मिळालेल्या जागतिक वारशाचे महत्व लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री पवार यांनी पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या या इमारतीला नवीन झळाळी मिळणार आहे.
हेही वाचा - डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वकिलाचा मृत्यू झाल्याचा सहकाऱ्यांचा आरोप; गुन्हा नोंद करण्याची मागणी
विद्यापीठाला भेट देणाऱ्या पर्यटक आणि नागरिकांना आनंददायी वातावरण उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबई विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलणार आहे. याशिवाय या निर्णयातंर्गत यावर्षी पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तर उर्वरित निधी तीन टप्प्यात देण्यात येणार आहे.
हेही वाचा - इमारतीमध्ये सिलेंडरचा स्फोट, जीवितहानी नाही
मुंबई विद्यापीठ आणि एमएमआरडीए यांच्या समन्वयातून यासंदर्भातील आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी होणार आहे. फोर्ट कॅम्पसप्रमाणे विद्यापीठाच्या कलिना येथील इमारतींची सौंदर्यवृद्धी, परिसराची स्वच्छता, वृक्षलागवड, अतिक्रमण निर्मूलन, शैक्षणिक सुविधांचा विकास याबाबतही बैठकीत चर्चा झाली. कलिना तसेच राज्यातील विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करणे तसेच शैक्षणिक सुविधा विकसित करण्यासंदर्भातही यावेळी निर्णय घेण्यात आले.
या बैठकीला वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, प्रभारी कुलगुरु प्रा. रविंद्र कुलकर्णी उपस्थित होते.