मुंबई : मागच्या आठवड्यामध्ये 40 वर्षे जुने असलेले शिवसेनेचे वांद्रे येथील शाखा कार्यालय बेकायदा असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने त्यावर कारवाई केली. ही कारवाई करत असताना छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांची विटंबना केली; असा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात एकूण 25 पेक्षा अधिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर हा आरोप आहे. परंतु त्यामध्ये माजी मंत्री, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यावर आज न्यायालयात सुनावणी झाली.
अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर : सरकारी पक्षाचे वकील जयसिंग देसाई यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, 'अभियंता त्या ठिकाणी कारवाईसाठी गेले असता काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धमकी दिली'. त्यामधे माजी मंत्री अनिल परब यांचा समावेश असल्याचा आरोप आहे. मात्र, अनिल परब यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी 4 जुलैपर्यंत जामीन अर्जाला मंजूर करत अनिल परब दिलासा दिला आहे.
न्यायाधीशच रजेवर : न्यायालयात आज सकाळी परब यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. तेथील न्यायाधीश रजेवर गेल्याने आमदार अनिल परब यांची चिंता वाढली होती. दोन न्यायमूर्तींसमोर जामीन अर्जावर सुनावणीसाठी हे प्रकरण दाखल करण्यात आले होते. मात्र, न्यायाधीशच रजेवर गेल्याने गोंधळ निर्माण झाला होता. नंतर हे प्रकरण दुसऱ्या न्यामूर्तींकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर अखेर न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली झाली.
परबांना दिलासा : यासंदर्भात परब यांचे वकील राहुल आरोटे यांनी ईटीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, अनिल परब यांच्याविरोधात आज अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश सकाळी रजेवर असल्याने हा अर्ज दुसऱ्या न्यायालयात दाखल करावा लागला. न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी परब यांचा जामीन अर्ज मंजूर करत सर्वांना दिलासा दिला आहे.