मुंबई : मुंबईमध्ये कमी दिवसात जास्त पाऊस पडतो. यामुळे मुंबईत पावसाचे पाणी साचून मुंबई ठप्प होते. मुंबई ठप्प होऊ नये, म्हणून पालिकेने दादर हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल येथे उपाययोजना (Relief from standing water to citizens) केल्या. त्याचप्रमाणे आता दादर टीटी, हिंदू कॉलनी, फाइव्ह गार्डन, माटुंगा, धारावी परिसरात साचणाऱ्या पाण्यावर पालिका उपाययोजना करत आहे. मुंबईमधील सर्वात मोठे पम्पिंग स्टेशन धारावी (Dadar TT to Dharavi Mumbai) येथे उभारले जाणार आहे.
धारावीत नवे पंपिंग स्टेशन : मुंबईमध्ये दरवर्षी पावसाचे पाणी साचते. दादर हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, सायन, बांद्रा नॅशनल कॉलेज, मिलन सबवे या ठिकाणी पाणी साचते. त्याच प्रमाणे दादर टीटी, हिंदू कॉलनी, माटुंगा आणि धारावी याठिकाणीही पाणी साचते. दादर टीटी ते धारावी पर्यंत साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेने दादर धारावी नाल्याच्या तोंडावर मुंबईतील सर्वात मोठे पंपिंग स्टेशन बांधले जाणार आहे. हे पंपिंग स्टेशन मिठी नदीच्या पॅकेज ३ मध्ये समाविष्ट होते. मात्र मुंबई पूरमुक्त करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायोजनांनुसार धारावी पम्पिंग स्टेशन तातडीने उभारण्याचा निर्णय अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी घेतला आहे. मागील सहा वर्षे सतत धारावी पम्पिंग स्टेशन बांधण्यासाठी मागणी केली होती. अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर त्यांनी प्राधान्याने पम्पिंग स्टेशन उभारले जाईल, अशी माहीती भाजपच्या माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी दिली.
धारावीत पंपिंग स्टेशनसाठी २५० कोटी : मिठी नदीच्या पॅकेज ३ साठी पालिकेने २१०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या पॅकेज अंतर्गत डीडी ड्रेन आणि पंपिंग स्टेशन बांधले जाणार होते. मात्र दादर, माटुंगा आणि धारावीतील पाणी साचण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेता, पालिका पंपिंग स्टेशनला प्राधान्य देऊन काम करणार आहे. डीडी ड्रेन आणि पंपिंग स्टेशनच्या बांधकामासाठी एकूण २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पंपिंग स्टेशनसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. हे पंपिंग स्टेशन धारावी टी जंक्शनजवळील खारफुटीमुक्त परिसरात केले जाणार आहे. त्याला मेघवाडी नालाही जोडण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. धारावी येथे पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी आणि डीडी नाल्याच्या कामासाठी सीझेडएमए आणि मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी मागितली आहे. परवानगी मिळण्यासाठी ६ महिने लागतील. त्यानंतर पुढील वर्षी एप्रिल २०२३ पासून पंपिंग स्टेशनचे काम सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
धारावीत सर्वात मोठे पंपिंग स्टेशन : मुंबईमध्ये पावसाच्या साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेने हाजी अली, ईला, लव्ह ग्रोव्ह, क्लीव्हलँड, ब्रिटानिया आणि गझदरबंध सहा पंपिंग स्टेशन उभारली आहेत. त्यामधील लव्ह ग्रोव्ह पंपिंग स्टेशन हे आज पर्यंतचे सर्वात मोठे आहे. लव्ह ग्रोव्ह पंपिंग स्टेशनची क्षमता ६० घनमीटर प्रति सेकंद आहे. तर धारावी पम्पिंग स्टेशनची क्षमता ७५ घनमीटर प्रति सेकंद आहे. हे पम्पिंग स्टेशन मुंबईमधील सर्वात मोठे पम्पिंग स्टेशन आहे. हे स्टेशन कार्यान्वयीत झाल्यावर दादर टीटी पाणलोट, हिंदू कॉलनी, फाइव्ह गार्डन, माटुंगा आणि धारावी या भागातील पाणी तुंबण्याची समस्या कायमची संपुष्टात येईल असा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.
६०० कोटींहून अधिक निधी खर्च : ईर्ला, वरळी, लव्ह ग्रोव्ह, ब्रिटानिया, क्लीव्हलँड, गझदर बंध, मोगरा व माहूल या आठ ठिकाणी पालिका पम्पिंग स्टेशन उभारणार होती. आतापर्यंत हाजी अली, ईला, लव्ह ग्रोव्ह, क्लीव्हलँड, ब्रिटानिया आणि गझदरबंध ही सहा पंपिंग स्टेशन उभारण्यात पालिकेला यश आले आहे. सहा पम्पिंग स्टेशनसाठी ६०० कोटींहून अधिक निधी खर्च करण्यात आले आहे.