मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी येथे घडलेल्या दरड कोसळण्याच्या घटनेत आतापर्यंत 21 जण दगावल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच या घटनेत जखमी झालेल्या आठ जणांवर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान आतापर्यंत 109 लोकांची ओळख पटली असून काही लोक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना घडली तेव्हा अनेक लोक हे मासेमारीसाठी भात शेतीसाठी घराबाहेर गेले होते तर काहीजण जवळच्या आश्रम शाळेत राहत होते. त्यामुळे हे लोक या दुर्घटनेतून बचावले आहेत. आतापर्यंत केवळ 109 लोक समोर आले असून उरलेले लोकही सुरक्षित असतील, अशी अपेक्षा आपण करूया असे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.
नागरिकांचे कंटेनरमध्ये तात्पुरते पुनर्वसन : या दुर्घटनेतील नागरिकांचे मदत कार्य आणि बचाव कार्य आज सकाळपासून पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले आहे. येथील नागरिकांना अन्नधान्य आणि कपडे यांचा पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या तात्पुरत्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी 50 ते 60 कंटेनर या ठिकाणी मागवण्यात आले आहेत. कंटेनरमध्ये या नागरिकांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. नागरिकांना पक्क्या घरांमध्ये स्थलांतरित केले जात नाही तोपर्यंत त्यांना आरोग्य आणि स्वच्छतेसह सर्व सुविधा या ठिकाणी पुरवल्या जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
इर्शाळवाडीच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चित : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर इथल्या कुटुंबांसाठी ताबडतोब पुनर्वसन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी एक जागाही निश्चित करण्यात आली आहे. या जागेवर ताबडतोब घरांची निर्मिती करावी, अशा सूचना सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आल्या आहेत. सिडकोकडे अनेक चांगल्या कंपन्या असल्यामुळे ताबडतोब घरांची निर्मिती होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
दरड प्रवणक्षेत्रातील गावांचे पुनर्वसन करणार : आमदार महेश बालदी यांनी या परिसरातील आणखी पाच वाड्या धोकादायक असल्याचे सांगत त्यांचेही पुनर्वसन करावे अशी मागणी केली. याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, या परिसरातील सर्वच धोकादायक वाड्यांचे पुनर्वसन करण्याचा तसेच राज्यातील अन्य दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे तातडीने पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. जे नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यास इच्छुक नसले तरीसुद्धा त्यांचे पुनर्वसन केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा: