मुंबई - मुंबई विद्यापीठ आणि सलंग्नित महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यापीठाच्या नावनोंदणी, पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र विभागामार्फत जिल्हा आणि क्षेत्रीय स्तरांवर हे आयोजन करण्यात आले होते. 30 एप्रिल ते 23 मे 2019 दरम्यान विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांत या कार्यशाळा पार पडल्या.
मुंबई विद्यापीठामार्फSeत गेल्या अनेक वर्षांपासून पदवीच्या प्रथम वर्षाची प्रवेशपूर्व नावनोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबवली जाते. या प्रक्रियेत प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची पात्रता, स्थलांतर आणि अनुषांगिक इतर प्रशासकीय बाबींसंदर्भात महाविद्यालयांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र विभागातील उपकुलसचिव आणि कर्मचारी वर्गासंह एमकेसीएलच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग आणि पालघर जिल्ह्यांतील महाविद्यालयांत या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पदवीच्या प्रथम वर्षासाठी प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी, पात्रता, स्थलांतर आणि इतर अनुषांगिक बाबींसाठी महाविद्यालयांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी यावेळी प्रथमच एमकेसीएलमार्फत गुगलफॉर्म तयार करण्यात आला असून याद्वारे महाविद्यालये त्यांच्या समस्यांचे निराकरण करु शकतात.
विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी विद्यापीठाने तयार केलेल्या ई-सुविधा अॅपचा अधिकाधिक विद्यार्थी आणि महाविद्यालयांमार्फत वापर करण्याचे आवाहनही या कार्यशाळेत करण्यात आले. या कार्यशाळेत मुंबई परिक्षेत्रातील 90, ठाणे 57, नवी मुंबई 61, रायगड 36, खेड 26, रत्नागिरी 22, सिंधुदूर्ग 15 आणि सावंतवाडी 25 अशी एकूण 395 महाविद्यालयांनी सहभाग घेतला आहे.