मुंबई - राज्यातील बांधकाम आणि इतर कामगारांच्या नोंदणीसाठी आमच्या विभागाकडून नुकतेच आदेश दिले असून त्यासाठीची नोंदणी सुरू झाली आहे. कोरोना आणि त्या संदर्भातील परिस्थिती लक्षात घेऊन ही नोंदणी पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने केली जात असल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज मुंबईत दिली.
कोरोनाच्या काळात राज्यातील संघटित आणि असंघटित कामगार मोठ्या प्रमाणात अडचणीत असल्यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्यात ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी आमच्या मंडळाकडे करण्यात आली होती, अशा तब्बल साडे दहा लाखांहून अधिक कामगारांना सरकारकडून सुरुवातीला दोन आणि नंतर तीन हजार असे प्रत्येकी पाच हजार रुपयाची मदत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट मोठे आहे. मात्र, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे आणि व्यवहार अडचणीत सापडले आहेत, त्यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे रोजगाराचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक उद्योगांचे उत्पादन बंद झालेले आहे. त्यामुळे उद्योग व्यवसाय पुन्हा सुरळीत होतील, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासोबतच कामगारांना त्यांना रोजीरोटी मिळेल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. बांधकाम कामगारांच्या नोंदणी संदर्भात अधिकाधिक प्रक्रिया सुलभ व्हावी, म्हणून त्यांची नुकतीच नोंदणी करण्याचे आदेश आमच्या विभागाकडून देण्यात आले आहेत. ही नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जात असून यासाठीची सुरुवात नुकतीच झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा - गायब झालेल्या श्वानाच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले अन् धक्काच बसला...
मुंबई, ठाण्यातील विविध नाक्यानाक्यांवर असंघटित क्षेत्रातील नाका कामगार उभा असून त्यांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अशा कामगारांसाठी कामगार विभागाकडून काही उपाययोजना केल्या जात आहेत का?, या संदर्भात विचारले असता कामगार मंत्री म्हणाले की, नोंदणीकृत कामगाराच्या संदर्भात सरकारकडे विविध योजना असल्या तरी असंघटित क्षेत्रातील आणि मुंबई, ठाणे आदी शहरातील विविध नाक्यांवर रोजगाराच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या कामगारांच्या हमखास रोजगाराबाबत सध्या सरकारकडे तूर्तास कोणत्याही प्रकारची योजना नाही.
हेही वाचा - राज्यात कोरोनाचा उद्रेक; २४ हजार ६१९ नव्या रुग्णांची नोंद, ३९८ मृत्यू