मुंबई - बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षेसाठीच्या नोंदणी 8 जूनच्या मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली आहे.
नोंदणी प्रक्रियेला सुरुवात -
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा बारावीच्या परीक्षेबाबत साशंकता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेता सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नोंदणीही थांबवली होती. मात्र, बारावीच्या परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यांकनावर निकाल जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर सीईटी सेलनेही व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, अॅग्रीकल्चर या अभ्यासक्रमासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटीच्या प्रवेश परीक्षेसाठी 8 जूनच्या मध्यरात्रीपासून नोंदणी प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. ही नोंदणी प्रक्रियेला एक महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
हेही वाचा - मी काही नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो.. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुदतवाढ देण्यात येणार -
कोरोनाची पार्श्वभूमी व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून मुदतवाढ देण्यात येणार आहे. तसेच परीक्षेसंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे. एमएचटी सीईटीच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीनंतर आठ ते 10 दिवसांनी अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या म्हणजेच एमबीए, एमसीए, विधी, बीएड, बीए.बीएड, एमए एमएड, फाईन आर्ट या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला सुरुवात होईल, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी दिली. नोंदणीच्या माहितीसाठी सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करण्यात आली आहे.
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा महत्वाची -
एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षेसाठीच्या नोंदणीला 8 जूनच्या मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली. इंजिनियरिंग, मेडिकल, फार्मसी, अॅग्रीकल्चर या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा महत्त्वाची असते. गतवर्षी एमएचटी सीईटीच्या परीक्षेला राज्यातून ४ लाख ३२ हजार १० विद्यार्थ्यांनी नोंदणी तर राज्याबाहेरील १९ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती.