मुंबई : कोरोना महामारीनंतर देशातील एकूणच बांधकाम व्यवसायाला उतरती कळा लागल्याचे चित्र असले तरी मुंबईतील वरळी येथील एका अलिशान इमारतीच्या 23 सदनिकांची विक्री बाराशे कोटी रुपयांना झाल्याची माहिती समोर येत आहे.
दमानी यांनी घेतली मालमत्ता : वरळीतील डॉक्टर आणि पेशंट रोडवर असलेली या इमारतीतील 23 अलिशान सदनिका 'डी मार्ट' समूहाचे राधाकृष्ण दमानी आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती तसेच त्यांच्या मित्र परिवारातील व्यक्तींनी घेतल्याची माहिती समोर येत आहे. ही इमारत विकासात सुधाकर शेट्टी यांनी उभी केली असून त्यांच्यासोबत विकासक विकास ओबेराय हे भागीदार होते. यातील प्रत्येक सदनिका सुमारे पाच हजार चौरस फुटांची आहे. प्रत्येक सदनिकेची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार 50 ते 60 कोटी रुपये आहे. या 23 सदनिकांच्या विक्रीतून आलेली सुमारे बाराशे कोटी रुपयांची रक्कम यापैकी एक हजार कोटी रुपये सुधाकर शेट्टी हे पिरामल फायनान्स यांना परत करण्याची शक्यता आहे. कारण, या प्रकल्पासाठी सुधाकर शेट्टी यांनी पिरामल फायनान्स यांच्याकडून एक हजार कोटी रुपये कर्ज काढले होते.
कर्जामुळे कमी किमतीत विक्री? विकासात सुधाकर शेट्टी यांच्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने त्यांनी या सदनिका सवलतीच्या दरात विकल्याची चर्चा सुरू आहे. पिरामल फायनान्स यांच्यासोबतच सुधाकर शेट्टी यांनी हॉंगकॉंग येथील एसी लोवी ग्लोबल बँकिंग या संस्थेकडूनही 400 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती समोर येत आहे. दमानी आणि शेट्टी यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून या मालमत्ते संदर्भात चर्चा सुरू होती. अखेरीस नुकताच या मालमत्तेचा व्यवहार झाला आहे. वास्तविक ऍनी बेझंट रोडवरील या इमारतीच्या लगतच्या इमारतींमधील सदनिका यापूर्वी 70 ते 80 कोटी रुपये रुपयांना विकल्या गेल्या आहेत. सुधाकर शेट्टी यांनी उभारलेल्या दोन टॉवरपैकी एका टॉवरमध्ये रिच हॉटेल तर दुसऱ्या टॉवरमध्ये निवासी सदनिका असणार आहेत.
सर्वांत महागड्या सदनिका : पाच हजार चौरस फुटांसाठी 60 ते 70 कोटी रुपये दर मोजावा लागला असल्याचे या व्यवहारातून समोर आले आहे. यानिमित्ताने देशातील सर्वांत मोठा व्यवहार झाला आहे, अशी चर्चा बांधकाम वर्तुळात सुरू आहे. केवळ 23 सदनिकांसाठी बाराशे कोटी रुपये मोजले गेले आहेत. यापूर्वी सुद्धा दमानी कुटुंबीयांनी मलबार हिल येथे हजार कोटी रुपयांची अशीच एक महत्त्वाची मालमत्ता विकत घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.