मुंबई - विधान परिषदेत महाविकास आघाडीचे संख्याबळ अधिक आहे. सत्तेत आल्यानंतर भाजपने महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी रणनीती आखली आहे. गेल्या आठवड्यापासून शिक्षक, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत नाशिक पाठोपाठ औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीत उफाळलेली बंडखोरी हा त्याचाच भाग असल्याचे बोलले जाते. अशातच अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडीमुळे महाविकास आघाडाची मोठी कोंडी झाली आहे. एकीकडे भाजपचे संख्याबळ कमी असताना, दुसरीकडे बंडखोरांचे आव्हान पेलावे लागणार आहे.
शिक्षक, पदवीधरांसाठी 83 उमेदवार रिंगणात - सध्या पाच जिल्ह्यात शिक्षक, पदवीधरांसाठी 83 उमेदवार रिंगणात असल्याने महाविकास आघाडीची चांगलीच डोकेदुखी वाढल्याचे दिसून येत आहे. विधान परिषदेतील रिक्त झालेल्या नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण आणि अमरावती या पाच जागांसाठी शिक्षक, पदवीधर निवडणुका होत आहेत. पाच जिल्ह्यातून सुमारे 83 अर्ज दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी तसेच भाजपमध्ये या निवडणुकीत थेट लढत होणार आहे. पाच पैकी दोन जागांवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच शेकाप प्रत्येकी एक जागा लढणार आहेत.
महाविकास आघाडीत बंडखोरी - भाजपने नाशिक, नागपूर वगळता चार ठिकाणी उमेदवार दिले आहेत. सुरुवातीपासून महाविकास आघाडी, भाजपमध्ये चुरस होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. नाशिकमध्ये डॉ. सुधीर तांबे ऐवजी सत्यजीत तांबेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत, बंडखोरी केली. नाशिक पाठोपाठ औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश इटकेलवार यांनी बंडखोरी केली आहे. पक्षाने दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, बंडखोरीचा सामना महाविकास आघाडीला करावा लागणार आहे. काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी असतानाही तत्कालीन आमदार सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे काँग्रेसने त्याच्यावर पक्षभंगाची कारवाई केल्याने ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
निवडणुकीचा गुलाल कोण उधाळणार - भाजपने इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील यांना वेटिंगवर ठेवत अधिकृत उमेदवारी नाकारली. शिवसेनेने यामुळे पाटील यांना मातोश्रीवर बोलवून पाठिंबा जाहीर केला. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पाटील नॉट रिचेबल झाल्याने चिंता वाढली. आता पाटील यांना पाठिंबा देण्यास स्थानिकांतून मोठा विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. नागपूर शिक्षक मतदार संघ, नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण 27 अर्ज आले होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी आज उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता 22 उमेदवार रिंगणात आहे. ना.गो गाणार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार आहेत. भाजपचा त्यांना पाठिंबा आहे. सुधाकर अडबाले हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार असून काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढणार आहेत. तर सतीश इटकेलवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नसताना, अर्ज मागे न घेतल्याने निलंबनाची कारवाई केली आहे.
35 जणांची माघार, 83 रिंगणात - महाविकास आघाडी, शिंदे-फडणवीस सरकारने प्रतिष्ठेच्या केलेल्या विधानपरिषद निवडणुकीतून सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ३५ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता ८३ जण रिंगणात आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघातून एकूण २२ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ६ जणांनी माघार घेतली आहे. आता या मतदार संघात १६ उमेदवार रिंगणात आहेत. कोकण पदवीधरमध्ये एकूण १३ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ५ जणांनी माघार घेतल्याने आता ८ उमेदवार रिंगणात आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून एकूण २३ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ९ जणांनी माघार घेतली आहे. आता तेथे १४ उमेदवार मैदानात आहेत. भाजपची हमखास विजयी ठरणाऱ्या अमरावती पदवीधरमध्ये एकूण ३३ अर्ज दाखल झाले होते. त्यातील १० जणांनी माघार घेतली असून २३ उमेदवार रिंगणात आहेत. तर, नागपूर शिक्षकमध्ये २७ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ५ जणांनी माघार घेतली असून आता २२ उमेदवार रिंगणात आहेत.