मुंबई - दाभोळकर-पानसरे हत्याकांडातील खटले सुरु करण्यास सज्ज असल्याची माहिती सीबीआय आणि एसआयटीने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. पुणे आणि कोल्हापूर सत्र न्यायालयातील खटल्यांवरील स्थगितीसाठी केलेले अर्ज तपासयंत्रणांकडून मागे घेण्यात आले आहेत. तसेच पुरोगामी महाराष्ट्रात विचारवंताच्या हत्या आणि वर्षानुवर्ष तपास रखडणे, ही बाब निंदनीय असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, खटल्याच्या स्थगितीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेण्यात आल्याने गेली चार वर्षे रखडलेले खटले आता पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तथापि, कट रचल्याबद्दल एजन्सी तपास सुरू ठेवतील, अशी माहिती तपासयंत्रणांनी उच्च न्यायालयाला दिली. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पिटाळे यांच्या खंडपीठाने या दोन्ही एजन्सींची निवेदने नोंदविली आणि न्यायालय त्यांच्या तपासावर लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले. न्यायमूर्ती शिंदे म्हणाले, 'तपासणी योग्यप्रकारे होत नाही याबद्दल आम्हाला थोडीशी शंकादेखील उपस्थित होईल, अशी परिस्थिती नको. आम्ही या प्रकरणाचा तपासावर लक्ष ठेवू आणि आपण काय पावले उचलली हे सुद्धा तपासू.'
दाभोलकर आणि पानसरे यांच्या कुटुंबीयांचे प्रतिनिधित्व करणारे वकील अभय नेवागी यांनी दिलेल्या निवेदनानंतर 'कोर्टाच्या हस्तक्षेपामुळेच हा खटला आतापर्यंत पोहोचला आहे, असे न्यायमूर्ती शिंदे म्हणाले. तसेच न्यायालय या प्रकरणाच्या मुळाशी जाईल, असा निर्धार कोर्टाने व्यक्त केला. महाराष्ट्रासारख्या आधुनिक राज्यात असे घडल्यास हे निश्चितच चिंताजनक आहे, असे खंडपीठाने नमूद केले आहे. दरम्यान, दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येप्रकरणी, त्यांच्या कुटुंबीयांकडून दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय १५ एप्रिलला पुढील सुनावणी करणार आहे.
हेही वाचा - परमबीर सिंह यांच्या लेटरबाँब प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात पाचवी याचिका दाखल
हेही वाचा - घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्यास मोदी सरकारचा विरोध; दिलं 'हे' कारण