मुंबई - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा (पुरवणी) शुक्रवारी २० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भवामुळे या परीक्षेसाठी यंदा विद्यार्थींची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याचे दिसून आले आहे. आजपासून होत असलेल्या या फेरपरीक्षेला राज्यभरातून दहावीच्या ४२ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी तर बारावीच्या ६७ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच राज्यातील ६७२ केंद्रावर ही परीक्षा होणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा लांबणीवर पडल्या-
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असताना राज्य शिक्षण मंडळाच्या या फेरपरिक्षेला सुरुवात होत आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाकडून त्यासाठी योग्य प्रकारची खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. राज्य शिक्षण मंडळाकडून राज्यात फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या आणि श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही फेरपरीक्षा सुरू होत आहे. दरवर्षी जुलैमध्ये फेरपरीक्षा घेण्यात येते. तर सप्टेंबरमध्ये निकाल जाहीर होतात. या विद्यार्थ्यांना त्याच शैक्षणिक वर्षात पुढील वर्गात प्रवेशही मिळतो. मात्र, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. त्यातही मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये मागील काही महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होता. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दहावी-बारावीच्या या फेरपरीक्षेला दरवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. दरवर्षी सुमारे एक ते दीड लाख विद्यार्थी फेरपरीक्षा देतात. दहावी आणि बारावीच्या दोन्ही इयत्तांचे मार्चमधील परीक्षेचे वाढलेले निकाल, लांबलेली परीक्षा आणि शैक्षणिक वर्ष, कोरोनाची धास्ती यामुळे परीक्षार्थींची संख्या काही प्रमाणात घटली असल्याचे शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.
हेही वाचा- ग्रामपंचायत निवडणुकांचा यापूर्वीचा कार्यक्रम रद्द, नव्याने जाहीर होणार तारखा