मुंबई - मुंबई पोलिसांनी कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारी याचा कर्नाटक पोलिसांकडून ताबा घेतला आहे. त्याला आता मुंबईत आणण्यात आले आहे. मंगळवारी गँगस्टर रवी पुजारी याला मकोका कोर्टात हजर करण्यात आले आहे. मोक्का कोर्टाकडून मुंबई पोलिसांनी पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली होती. त्याला आता न्यायालयाने 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांना मिळाला ताबा
कुख्यात गँगस्टर रवी पुजारीविरुद्ध मुंबईत दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यास अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून प्रत्यर्पण प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सेनेगल येथून रवी पुजारी याचे प्रत्यार्पण करून त्याला सुरुवातीला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. बंगलोर, मंगलोर सह इतर ठिकाणी रवी पुजारीवर दाखल गुन्ह्यांवर त्या ठिकाणी खटला चालवला जात होता. मुंबई पोलिसांना तब्बल 49 गुन्ह्यांमध्ये हवा असलेला रवी पुजारी याच्या ताब्यासाठी मुंबई पोलिसांकडून कर्नाटक राज्यातील न्यायालयाकडे पाठपुरावा केला जात होता. कर्नाटक न्यायालयाकडून तशा प्रकारची परवानगी मिळाल्यानंतर रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांना मिळाला आहे.
स्वतःची टोळीही बनवली
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कर्नाटकातून त्याचा ताबा घेऊन त्यास अटक करण्यात आली आहे. रवी पुजारी हा मालपे, (कर्नाटक) येथील मूळचा राहिवासी आहे. 1990 मध्ये त्याने छोटा राजन टोळीसाठी काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने स्वतःची गुन्हेगारी टोळी बनवून खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न यासारखे गुन्हे केलेले होते. रवी पुजारीने मुंबई , बंगळुरु, मंगळुरु येथे वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसायिक, सिने क्षेत्रातली नामवंत अभिनेते यांना खंडणीसाठी धमकी दिली होती व त्यासाठी त्याने स्वतःची टोळीही बनवली होती.
बॉलिवूड कलाकारांना दिली होती धमकी
2009 ते 2013 या दरम्यान बॉलीवुड चित्रपटसृष्टीतील कलाकार सलमान खान,अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन तसेच शाहरुख खानला रवी पुजारीकडून धमकी देण्यात आली होती. शाहरुख खानचे करीम मोरानीसोबत असलेल्या व्यावसायिक संबंधांबद्दल रवी पुजारीने धमकी दिली होती. परदेशातील सेनेगल येथे वास्तव्यास असताना रवी पुजारीकडून नमस्ते इंडिया नावाची रेस्टॉरंट चेन चालवली जात होती. 21 जानेवारी रोजी त्याला सेनगलमधील डकार येथून अटक करण्यात आली होती. तिथे तो त्याच्या कुटुंबीयांसोबत अँथोनी फर्नांडिस या नावाने राहत होता.