मुंबई Rashmi Thackeray : विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेबाबतचा निकाल दिल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने या निकालाची चिरफाड जनता न्यायालयात केलीय. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय कसा चुकीचा होता आणि शिवसेनेने कसे पुरावे सादर केले होते हे या जनता न्यायालयात सांगण्यात आले. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आव्हान देण्यात आलं आहे. मात्र, असं असलं तरी आता घराघरात याबाबत माहिती गेली पाहिजे असा निर्णय शिवसेना उद्धव ठाकरे गटाने घेतला आहे.
घराघरात महिलांच्या स्वयंपाक घरापर्यंत : शिवसेना उद्धव ठाकरे गटाची महिला आघाडी आता आक्रमक झाली आहे. घराघरात प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचून अगदी स्वयंपाक घरापर्यंत जाऊन हा निकाल कसा चुकीचा आहे, हे महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सांगणार आहेत. घरातील महिलेला एकदा हा निर्णय चुकीचा आहे हे समजलं की, ती संपूर्ण घराला समजावून सांगेल असं शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि माजी महापौर विशाखा राऊत म्हणाल्या.
रश्मी ठाकरे मैदानात उतरणार : यासंदर्भात आता सर्व तयारी महिला आघाडीच्या वतीनं सुरू आहे. ही मोहीम केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. मुंबईमध्ये येता फेब्रुवारी महिन्यात विभाग वार महिला मेळावे घेण्यात येणार आहेत. या मेळाव्यांना रश्मी उद्धव ठाकरे या प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन करणार आहेत. रश्मी ठाकरे या नेहमीच महिला आघाडीमध्ये सक्रिय राहिल्या आहेत. पण त्या लोकसभा निवडणूक मात्र लढवणार नाहीत. त्या पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात यापुढे सक्रीय असणार आहेत. पण त्या निवडणुकीच्या राजकारणात उतरणार नाहीत असंही विशाखा राऊत यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा -