मुंबई - विरोधकांकडे कोणतेही प्रभावी मुद्दे नाहीत, त्यामुळे विरोधकांमधील अनेक आमदार भाजपच्या रांगेत असल्याचे खळबळजनक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकी दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी दानवे म्हणाले, लोकसभेच्या मोठ्या विजयानंतर पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक असल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंद आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्ष नोंदणी सुरू केली आहे. लोकसभेच्या सुमाराला 1 कोटी 50 लाख कार्यकर्त्यांची सदस्य नोंदणी झाली होती. आता त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली, असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली.
तसेच मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेले माजी मंत्री प्रकाश मेहता आणि राजकुमार बडोले बैठकीला उपस्तिथ नसल्याबाबत त्यांना विचारणा केली असता दानवे म्हणाले की, पक्षावर कुणाचीही नाराजी नाही. त्या नेत्यांना बैठकीला यायला थोडा उशीर झाला.
नव्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबतही दानवे यांनी भाष्य केले. प्रदेशाध्यक्ष सलग 2 वेळा पदावर राहू शकतो. मात्र, त्यांनतर त्या पदावर ठेवण्याची भाजपची परंपरा नाही. सध्या नव्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत पक्षात विचार चालू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबत सरकारला चिंता आहे. त्यासंदर्भात उपाययोजनाही सुरू आहेत. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दुर्दैवी असल्याचे दानवे म्हणाले