मुंबई - मातीची तहान भागवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे वक्तव्य साताराकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. नीरा - देवधर या योजनेचे पाणी आम्हाला मिळाले नाही. ते पाणी बारामतीला वळवण्यात आले असल्याचे म्हणत निंबाळकरांनी शरद पवारांवर टीका केली. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने माढ्यात संजय शिंदे विरुद्ध निंबाळकर असा सामना होण्याची शक्यता आहे.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रणजिंतसिंह यांच्या भाजपा प्रवेशाची माहिती दिली होती. निंबाळकर यांनी पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे. माढा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाचा फटका राष्ट्रवादीलाही बसणार आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे खासदार आणि माढ्यातील मातब्बर नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. दोन महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतलेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. रणजितसिंह यांना माढ्यातून उमेदवारी दिल्यास रणजितसिंह मोहिते पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, सध्यातरी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांची गोची झाल्याचे बोललं जात आहे.
नीरेचे पाणी आमच्याजवळ आले आहे. ते पाणी मिळावे ही आमची इच्छा होती. पण बारामतीकरांनी ते होऊ दिले नाही. बारामतीकरांनी रेल्वेही आनू दिली नाही. याचे आम्हाला दुःख आहे. आमच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मी सांगितले होते, की आघाडी असली तरी आम्ही राष्ट्रवादीला मदत करणार नाही असेही निंबाळकर म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्रातल्या नद्या प्रकल्पांना चालना देऊन मोहिते पाटील आणि निंबाळकर घराण्याचे स्वप्न पूर्ण करू - मुख्यमंत्री
पश्चिम महाराष्ट्रातल्या नद्या स्थिरीकरण प्रकल्पांना चालना देऊन मोहिते पाटील आणि निंबाळकर घराण्याचे स्वप्न पूर्ण करू असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विदर्भाला प्रचंड निधी दिला, पण त्यापेक्षा जास्त निधी पश्चिम महाराष्ट्राच्या प्रकल्पाला दिला आहे. विकासाच्या मुद्यावर तरुण पिढी आमच्याकडे येत आहे, त्यामुळेच महाराष्ट्राला नवीन दिशा आम्ही देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सदाभाऊंनी माढ्यातून चांगली लढत दिली होती, आता तर मोहिते पटीलच आपल्याकडे असल्याने माढा जिंकणारच असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.