मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन होता. त्याचा फटका लहान मुलांचे आवडते स्थान असलेल्या राणी बागलाही बसला. गेले ११ महिने बंद असलेली राणीबाग येत्या १५ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाकडून पालिका आयुक्तांकडे तसा प्रस्ताव सादर केला असून राणी बागेत खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, सुरक्षित अंतराचे मार्किंग, सॅनिटायझर आणि मर्यादित पर्यटकांनाच प्रवेश देण्याचा आराखडा सादर करण्यात आला आहे.
हेही वाचा - बीकेसीला लवकरच नवा साज! नवीन पदपथ, सायकल ट्रक, पार्किंग, ई-चार्जिंग आणि बरंच काही
राणीबाग पुन्हा खुली होणार
मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पर्यटकांचे आकर्षण असलेली राणीबाग बंद आहे. लॉकडाऊनच्या आधी राणी बागेत सरासरी दिवसाला १५ ते २० हजार पर्यंटक भेट देत होते. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवसांत हा आकडा ३० हजारपर्यंत जात असे. त्यातून महिन्याला सुमारे ४५ लाखांचा महसूल यातून मिळत होता. कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून दररोज तब्बल दीड लाखांचा महसूल बुडत आहे. मुंबईत कोरोना नियंत्रणात आल्याने टप्या टप्प्याने अनलॉक केले जात आहे. त्यामुळे, 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत तब्बल ११ महिन्यांनंतर राणी बाग पर्यटकांसाठी खुली करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. याबाबतचा आराखडा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.
..अशी घेतली जाईल खबरदारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राणी-पक्षांच्या पिंजर्यांजवळ, तिकीट खिडकीजवळ सुरक्षित अंतराचे मार्किंग करण्यात आले आहे. ठिकठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था केली जात आहे. सुरुवातीला पाच ते सहा हजार पर्यटकांनाच प्रवेश दिल्यास खबरदारी घेणे सोपे होईल. मात्र, यापेक्षा जास्त पर्यटक आल्यास प्रवेश देणे बंद केला जाईल, अशी माहिती राणी बागचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
हेही वाचा - ब्रिटनच्या मंत्री, दक्षिण आशियाच्या उप उच्चायुक्तांनी घेतला मुंबई महानगरपालिकेचा हेरिटेज वॉक