मुंबई - महिनाभर रोजा अर्थात उपवास केल्यानंतर आज देशभरात रमजान ईद साजरी केली जात आहे. पहाटेच्या नमाजेपासूनच रमजान ईदचा उत्साह दिसून आला आहे. मुंबईत वांद्रे स्थानकाबाहेरील जागेत हजारो मुस्लीम बांधवांनी ईदची मुख्य नमाज अदा केली. नमाज पठण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मुंबईत अनेक ठिकाणी सकाळी मुस्लीम बांधवांनी हजारोंच्या संख्येत ईदनिमित्त सामूहिक नमाज अदा केली. बांद्रा हा मुस्लीम बहुल विभाग असल्याने आणि मशिदीत एकाच वेळी सर्वांना प्रार्थना करता येत नसल्याने वांद्रे स्टेशनबाहेर यावेळी प्रार्थना करण्यात आली. मौलानांनी सर्वांना ईदनिमित्त संबोधून भारतात सुख शांती नांदण्याची प्रार्थना केली. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय डोंगरी, वांद्रे, मशीद बंदर, जोगेश्वरी, गोवंडी या मुस्लिमबहुल भागतही मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात आली.
ईदचे महत्त्व -
वर्षभरात दोनवेळा ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यातील पहिल्या ईदला 'ईद-उल-फित्र' आणि दुसऱ्या ईदला 'ईद-उल जुहा' असे म्हटले जाते. 'ईद-उल-फित्र' हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ 'आनंद' आणि 'फित्र' म्हणजे दान करणे. मुस्लीम धर्मातल्या तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला ईदच्या पावन पर्वाचा आनंद घेता यावा, यासाठी 'जकात' आणि 'फित्र'ची तरतूद मुस्लीम शरियत कायद्यामध्ये करण्यात आली आहे. 'जकात' हे ईदच्या आधी दिले जाते.त्यामुळे नंतर रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.