मुंबई Ramdas Kadam on Gajanan Keertikar : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाच्या नेत्यांची उमेदवारीच्या दृष्टीनं मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना शिंदे गटाचे दोन नेते आमने सामने आल्याचं दिसतंय. यामध्ये विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर आणि गटनेते रामदास कदम यांच्यामध्ये धुसफुस सुरू आहे. यासंदर्भात कोणत्याही परिस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा एक खासदार कमी होता कामा नये अशी आपली भूमिका असल्याचं रामदास कदम यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं. ते मुंबईत आमच्या प्रतिनिधीशी बोलत होते.
दोघांच्यामध्ये समेट घडवण्याचे प्रयत्न - यासंदर्भात मुखमंत्रीपातळीवर दोघांच्यामध्ये समेट घडवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कालच दिवाळी 'शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गजानन कीर्तीकर यांनी भेट घेतली आहे. आज रामदास कदम मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर कदम यांना त्यांच्या मुलाला उमेदवारी पाहिजे आहे का, असं विचारलं असता, आपण आपल्या मुलासाठी आग्रही नसल्याचं त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केलं. आता आज कदम मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. त्यामुळे या जागेचा तिढा सुटेल असं बोललं जात आहे.
मुलाचा फायदा होईल - दुसरीकडे गजानन कीर्तीकर हे मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघाचे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी प्रकृतीचं कारण सांगून निवडणूक लढणार नसल्याची चर्चा होती. मात्र आता ते निवडणुकीचा विषय निघाल्यावर फिट असल्याचं म्हणतात, ते योग्य नसल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं. त्याचवेळी जर वडील मुलामध्ये लढत झाली तर त्यात मुलाचा फायदा होईल, ते होता कामा नये. दोघे वेगवेगळ्या गटात असले तरी त्यांचं कार्यालय एकच आहे. त्यामुळे आपली एक सीट कमी होईल, म्हणूनच आपण वडील-मुलाच्या लढतीच्या विरोधात आहे, असं कदम ईटीव्हीशी बोलताना म्हणाले.
अमोल कीर्तीकर ठाकरे गटामध्ये - या मतदार संघात गजानन कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर ठाकरे गटामध्ये आहे. त्यांच्याकडून ही निवडणूक तो लढणार असल्याचं आता जवळ-जवळ निश्चित झालं आहे. अशावेळी जर या ठिकाणी पिता-पुत्रात लढत झाली, तर त्याचा फायदा मुलालाच होईल अशी अटकळ रामदास कदम यांनी बांधली आहे. तसंच आपण आपल्या मुलासाठी या मतदारसंघात आग्रही नसल्याचंही कदम यांनी स्पष्ट केलं. मात्र शिंदे गटानंच ही जागा जिंकली पाहिजे असं प्रांजळ मतही कदम यांनी मांडलं.
वादळ शमणार का - आज रामदास कदम मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत. दोन मोठ्या नेत्यांना मुख्यमंत्री एकापाठोपाठ दोन दिवसात भेटत आहेत. त्यात या दोघांच्यामध्ये खरा गद्दार कोण, यावरुन अलिकडच्या काळात वाक् युद्धही गाजलं होतं. त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच चर्चेत आला होता. त्यामुळे या दोन वरिष्ठ नेत्यांमधील वादळ शमणार का हे लवकरच स्पष्ट होईल.
हेही वाचा...