मुंबई - तौक्ते चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्यालादेखील बसला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये घरं, झाडांची पडझट झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले उद्या (20 मे) जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते तौक्ते चक्रीवादळामुळे पेण, माणगाव व महाड तालुक्यातील झालेल्या नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करणार आहेत.
शेतकरी, मासेमाऱ्यांना मोठा फटका
तौक्ते चक्रीवादळाचा फटका अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर या तालुक्यांना बसला आहे. अलिबाग तालुक्यात अनेक गावात सोसाट्याच्या वाऱ्याने पत्रे उडून नागरिकांचे नुकसान झाले आहे. शेती, आंबा बागायत यांचेही नुकसान झाले आहे. उसर येथील तीन गावांना पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी कोसळली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. गरीब मच्छिमार, शेतकऱ्यांबरोबरच आंबा बागायतदार आणि फळ उत्पादकांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. मच्छिमारांच्या बोटी, गोठे जमीनदोस्त झाल्याने प्रचंड हानी झाली आहे.
देवेंद्र फडणवीसही कोकण दौऱ्यावर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज (19 मे) त्यांनी रायगड जिल्ह्याची पाहणी केली. उद्या रत्नागिरी आणि परवा सिंधुदुर्ग जिल्ह्याची पाहणी करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्तांच्या मदतीची मागणी केली आहे. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेव्हाही फडणवीसांनी कोकण दौरा करत नुकसानाची पाहणी केली होती.
हेही वाचा - मोदींची महाराष्ट्राला सापत्न वागणूक, गुजरातला दिले 1 हजार कोटी