मुंबई - बुरखा घालणाऱ्या सर्वच महिला दहशतवादी नसतात. बुरखा ही मुस्लीम समाजाची पारंपारिक वेशभुषा असून त्यांना त्यांच्या संस्कृतीचे पालन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना बुरखा परिधान करण्यापासून प्रतिबंधीत करता येणार नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर श्रीलंका सरकारने बुरखा परिधान करण्यावर बंदी घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून या मुद्द्यावर प्रश्न उपस्थीत केला. रावणाच्या लंकेत जर बुरखा परिधान करण्यावर बंदी येऊ शकते तर रामाच्या अयोध्येत तो कायदा का केल्या जात नाही, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या अनुषंगाने शिवसेनेने या मुद्द्याला हात घातला.
मात्र, या मुद्दावर रामदास आठवले यांनी स्पष्ट असहमती दर्शवली. बुरखा ही मुस्लीम समाजाची पारंपारीक वेशभुषा असून प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला त्यांच्या प्रथा, परंपरा यांचे पालन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बुरखा बंदी या मुद्द्याला विरोध करत त्यांनी बुरखा पध्दतीचे समर्थन केले आहे.