मुंबई- 'राहुल गांधी यांची देशाच्या राजकारणातील किमिया संपली आहे. ते सध्या राजकारणात सक्रिय नाहीत. राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्यांची जादू चालणार नाही,' अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदार आठवले यांनी केली आहे. साकीनाका येथे आज शिवसेना महायुतीचे उमेदवार दिलीप लांडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- मुख्यमंत्री हे मैदानातून पळ काढलेले पैलवान - विजय वडेट्टीवार
राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आहे. विविध पक्षातील उमेदवार नेते एकमेकांचे उणेदुणे काढत विकासावर न बोलता काही ठिकाणी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. आज साकीनाका येथे शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे प्रचार करण्यासाठी राज्यात व मुंबईत येत आहेत. याचा युतीच्या निकालावर काय प्रभाव पडणार यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्याने राहुल गांधी हे पूर्णतः राजकीयदृष्ट्या खचून गेले आहेत. त्यांची राजकारणातील किमया पूर्णपणे संपली आहे. राज्यात त्यांच्या प्रचार सभा जरी झाल्या तरी राज्यात कोणताही बदल होणार नाही. पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत येणार,' असे आठवले म्हणाले.