मुंबई: याबाबत बोलताना राम कदम म्हणाले आहेत की, माझ्या घाटकोपर पश्चिम या मतदार संघात जोपर्यंत मुबलक पाणी येत नाही तोपर्यंत मी केस कापणार नाही. मी आत्तापर्यंत माझ्या आई-बापासमान असणाऱ्या लाखो भक्तांना घेऊन काशी यात्रा घडवली आहे. मला माझे मतदार महत्त्वाचे असून त्यांच्यासाठी मी सर्व काही करायला तयार आहे. घाटकोपरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या काही नेत्यांनी पूर्ण डोंगर व्यापून टाकला आहे. त्यावर अनधिकृत झोपड्या बांधून पाण्याच्या नावाने धंदा चालवला आहे. या धंद्याने त्यांनी आपली घर भरली असून दुकानदारी चालू आहे. पण जोपर्यंत त्यांना मुबलक पाणी भेटत नाही तोपर्यंत मी माझी प्रतिज्ञा, माझी शपथ आहे की मी केस कापणार नाही.
ठाकरे यांच्या काळातील भ्रष्टाचार: पण राज्यात तुमचे सरकार असताना ही परिस्थिती का येत आहे असे राम कदम यांना विचारले असता, ते म्हणाले की काही गोष्टी गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. नवीन टाक्या बांधाव्या लागणार आहेत. दर आठवड्याला बैठक सुरू आहे. राज्यात शिंदे-फडवणीस सरकार असले तरीसुद्धा हे काम महानगरपालिकेचे आहे. भ्रष्टाचारी उद्धव ठाकरे यांचे त्यादरम्यान सरकार होते. तेव्हा भ्रष्टाचाराच्या गर्तेत हे सर्व झाले आहे. परंतु आता लवकरच घाटकोपरला शंभर टक्के पाणी भेटणार आहे. दररोज अंघोळ केल्यावर आरशासमोर मला माझ्या आई-बहिणीचे दुःख दिसले पाहिजे म्हणून मी हे केस वाढवले आहेत. मी जनतेला जे वचन दिले आहे ती वचनपूर्ती मला पूर्ण करावीच लागेल. त्यासाठी हे सर्व काही करत आहे. तसच घाटकोपर पश्चिमच कशाला, पूर्ण मुंबईत पाणी नाही आहे. कुणालाही पाणी भेटत नाही, असेही राम कदम म्हणाले आहेत.
सरकार यांचे व शेंडीला गाठही हेच मारणार? याविषयी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राम कदम यांनी त्यांच्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. यावरून त्यांची पक्षात किती चालते हे दिसून येते. राज्यात सत्ता त्यांचीच आहे. परंतु हे सरकार जनतेच्या विरोधात काम करत आहे. त्यांची कामे होत नाहीत म्हणून त्यांनी शेंडीला गाठ मारली आहे. यावरून समजते की हे सरकार जनतेच्या हितासाठी काम करीत नाही आहे. राज्यात सत्ता पक्षाच्या आमदाराला काम होत नाहीत म्हणून शेंडीला गाठ मारावी लागते, यापेक्षा दुर्दैव काय? असा टोला नाना पटोले यांनी राम कदम यांना लगावला आहे.