मुंबई : कांद्यावरून राज्यासह देशातले राजकारण तापले असून, केंद्र सरकारने दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला आहे. तर कांदा खरेदीचा दर 24 रुपये दहा पैसे असणार आहे. खरंतर 'बैल गेला आणि झोपा केला' अशी सरकारची अवस्था आहे अशी टीका, केंद्र सरकारच्या निर्णयावर राजू शेट्टी यांनी केली आहे.
सरकारने शेतकऱ्यांची माती केली : केंद्र सरकारच्या कांदा खरेदीच्या निर्णयावर टीका करताना शेट्टी पुढे म्हणाले की, जर सरकारला कांदा खरेदी करायचाच होता, तर नाफेडने दीड महिन्यांपूर्वी कांदा का विकला? तो कांदा बाजारात आणल्यामुळे कांद्याचे दर पडले आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याला जबाबदार कोण? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. सरकारकडे काही धोरण आहे की नाही, सरकारला नेमकी माहिती आहे की कांद्याची एकूण मागणी किती, पुढे काय होणार आहे. मात्र माहीत असतानाही सरकारने बाजारात कांदा आणला आणि शेतकऱ्यांची माती केली.
केंद्र सरकारने नुकताच कांदा खरेदीचा निर्णय घेतला असून, दोन लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. मात्र बाजारातील कांद्याचे दर पडेपर्यंत सरकारने वाट पाहिली आणि शेतकऱ्यांचे नुकसान केले. जर सरकारला कांदा खरेदी करायचीच असेल तर ती 30 रुपयांनी करावी. अन्यथा हे माकडचाळे सरकारने करू नये. राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते
तीस रुपयांनी खरेदी करावी : सध्या कांद्याची खरेदी सरकार करत आहे. मात्र ही खरेदी किमान 30 रुपये दराने करायला हवी होती. कारण तीस रुपये दराने खरेदी केली असती तर कांद्याचे मार्केट स्थिर राहिले असते. वास्तविक बाजारामध्ये आता येत असलेला कांदा हा जूनमध्ये झालेल्या पावसात सापडलेला आहे. त्यानंतर अपार मेहनतीने हा कांदा शेतकऱ्यांनी वाचवला. तो कांदा आता बाजारात येत आहे. एखाद्याकडे दहा क्विंटल कांदा असेल तर त्याच्याकडे जेमतेम तीन ते चार क्विंटल कांदा शिल्लक राहिला आहे. म्हणजे कांदा उत्पादनाचा खर्च दहा क्विंटलचा झालेला आहे. जर कांद्याचे भाव वाढले म्हणजे काय शेतकऱ्याला प्रचंड फायदा झाला अशी परिस्थिती नाही. शेतकऱ्याचे नुकसानही झालेले आहे. सरकारची ही प्रवृत्ती बरोबर नाही. हे दर जास्तीत जास्त महिना, दीड महिना राहणार आहेत. पुन्हा कांद्याचे दर पडणार आहेत. त्यामुळे सरकारने असले माकडचाळे करू नयेत असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.
हेही वाचा -