मुंबई- कर्नाटकातील आमदार थांबलेल्या सोफिटेल हॉटेलमध्ये भाजप नेते ठाण मांडून बसल्याचे समोर आले. यामुळे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सत्तानाट्यासंबधी केलेला दावा फोल ठरला.
राजीनामा दिलेले सर्व आमदार मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील सोफिटेल हॉटेलमध्ये होते. भाजपचे अनेक नेते काँग्रेस-जेडीएस आमदारांची मनधारणी करण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी सोफिटेल हॉटेलमध्ये पोहोचल्याचे समोर आले. भाजप नेते प्रसाद लाड आणि मनोज कंबोज हे सकाळपासून सोफिटेल हॉटेलमध्ये ठाण मांडूण बसल्यामुळे कर्नाटक नाट्याशी भाजपचा संबध नसल्याचा राजनाथ सिंह यांनी संसदेत केलेला दावा फोल ठरला आहे.
सत्ताधारी काँग्रेसच्या 8 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आतापर्यंत काँग्रेसच्या 13 आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार धोक्यात आले आहे. काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांनी राजीनामा दिल्याने त्यांचे संख्याबळ घटले.
राज्यात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. बहुमतासाठी 113 आमदारांची आवश्यकता असून काँग्रेसचे 80, जेडीएसचे 37 आणि बसपाचा एक आमदार 118 आमदारांच्या संख्याबळावर जेडीएस-काँग्रेस सत्तेत आले होते. तर भाजपकडे 105 आमदारांचे संख्याबळ असून त्यांना एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा आहे.