मुंबई - राज्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने निर्बंधात पुन्हा शिथिलता आणली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. तर रेस्टॉरंट आणि हॉटेल्सना १५ ऑगस्टपासून रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. धार्मिक मंदिरे, मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहांना मात्र निर्बंध कायम राहतील, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते सह्याद्री अतिथीगृहात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
हॉटेल्स, रेस्टॉरंट १० पर्यंत सुरू राहणार
15 ऑगस्टपासून निर्बंधातून सूट देण्यात येणार आहे. त्यानूसार हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.
मॉल्स सुरू, पण...
राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मॉल्स सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. मॉलमध्ये ५० टक्के लोकांना जाता येणार आहे. मॉलमधील सर्व दुकाने, शॉपमध्ये कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती राहणार आहे. केवळ २ लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये देखील ५० टक्के लोकांची उपस्थिती अनिवार्य असेल.
धार्मिक मंदिरं, सिनेमागृह बंदच
राज्य सरकारने सिनेमागृह, नाट्यगृह सुरु करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. पुढील आदेशापर्यंत ते बंद राहणार आहेत. धार्मिक स्थळांबाबत सध्या निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, असे आरोग्य मंत्री टोपे यांनी म्हणाले.
बळजबरीने प्रवास केल्यास कारावास
ज्या नागरिकांनी कोरोना लसींचे दोन डोस घेतले आहेत, दोन डोस घेऊन १५ दिवस झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. अशा नागरिकांना मासिक आणि त्रैमासिक पास देण्यात येणार आहे. मात्र, पासची वैधता पडताळणीबाबत रेल्वेला अधिकार देण्यात आले आहेत. पास ज्या दिवसापर्यंत असेल त्याच दिवसापर्यंत नागरिकांना प्रवास करता येणार आहेत. विना तिकीट, बळजबरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 500 रुपयांचा दंड आणि रेल्वे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा केली जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.
लग्नाला 200 लोकांना परवानगी
खुल्या प्रांगणातील विवाह सोळ्यात २०० जणांच्या उपस्थितीची परवानगी दिली आहे. तर मंगल कार्यालयातील विवाह सोळ्यांना बैठक क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी असेल. इनडोअर खेळ सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी दोन डोसचा नियम बंधनकारक राहील. तसेच खासगी कार्यालयांना २४ तास सुरु ठेवण्याची मुभा असेल. कार्यालयात २५ टक्के क्षमतेने शिफ्ट्समध्ये काम कामाच्या सूचना दिल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे टोपे म्हणाले.
...तर पुन्हा लॉकडाऊन
'तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून एकूण उत्पादीत होणारा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन १३०० मेट्रिक टन आहे. त्यामध्ये आणखी २०० ते ३०० मेट्रिक टन वाढ केली जाईल. दरम्यान, ४५० पीएसए प्लांटची ऑर्डर देण्यात आली आहे. यापैकी १४१ प्लांटची सुरुवात प्रत्यक्षात झाली आहे. म्हणजेच ऑक्सिजन निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. येत्या काळात १७०० ते २००० मेट्रिक टन उपलब्ध होऊ शकेल. तर ‘केंद्र शासनाने तिसऱ्या लाटेच्या संदर्भात सांगितले होते, की दुसऱ्या लाटेचा कालावधी ऑक्सिजनचा जो पिक होता; त्याच्या दीडपटीपर्यंतची व्यवस्था करा, असे सूचित केल्याच्या कारणाने जवळजवळ ३८०० मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजन लागू शकणार आहे. पण तिसऱ्या लाटेमध्ये ज्या दिवशी ७०० मेट्रिक टन दररोज लागेल, त्यावेळेस महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन ऑटोमोडमध्ये करण्यात येईल', असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली.
हेही वाचा - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता; मुंबईत पालिकेने 'हा' घेतला निर्णय