मुंबई - राज्यातील जातीयवादी शक्तीविरोधात तीव्र लढा देणारे दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे नेते, ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे सोमवारी सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनाने एका पँथर पर्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांची अंत्ययात्रा बुधवारी दि. 17 जुलै रोजी दुपारी 12 वाजता विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवसस्थानाहून सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथील इलेक्ट्रीक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालय येथे नेण्यात येत असल्याची माहिती त्यांची कन्या गाथा ढाले यांनी दिली आहे.
राजा ढाले यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच आंबेडकरी जनतेत तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला आहे, अशी शोकभावना व्यक्त करून दिवंगत राजा ढाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.