मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने मुंबई व महाराष्ट्रातून कामगार आपल्या राज्यात परतले आहेत. मात्र, आता या कामगारांवरून राजकारण होऊ लागले आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्त्याव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. यापुढे आमची आणि महाराष्ट्र पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय राज्यात येता येणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तरप्रदेश सरकारची परवानगी लागेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. त्यावर महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची आणि आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र सरकारनेही या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले. यापुढे महाराष्ट्रात कामगार आणताना त्यांची नोंद करावी. पोलीस ठाण्यात त्यांचे फोटो आणि ओळख असली पाहिजे. तरच महाराष्ट्रात त्यांना प्रवेश द्यावा, हा कटाक्ष महाराष्ट्र सरकारने पाळावा असे राज ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्व पक्षीय बैठकीतही राज ठाकरे यांनी परराज्यातील कामगारांची नोंद करण्याची मागणी केली होती.