मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह श्री सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
राज ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथील निवासस्थान कृष्णकुंज येथे आज सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज ठाकरे स्वतः पत्नीसह सर्व कार्यकर्त्यांना भेटून शुभेच्छा स्विकारत आहेत.
'स्वरराज' ते 'राज' ठाकरे -
राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ साली झाला. संगितकार श्रीकांत ठाकरे यांच्या घरात जन्मलेल्या राज ठाकरे यांचे संगिताशी आपसूक नाते निर्माण होणे सहाजिक होते. त्यासाठी वडील श्रीकांत ठाकरे यांनी राज यांना तबला, गिटार आणि व्हायोलिन शिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज यांची बोटं तबला आणि व्हायोलिनपेक्षा कॅनव्हासवर अधिक चांगल्यापद्धतीने फिरायला लागली. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणेच त्यांनी एक कार्टूनिस्ट म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. राज यांचा राजकीय प्रवासही बाळासाहेबांच्याच छत्रछायेत सुरू झाला. शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेतून राज राजकीय पटलावर आले. शिवसेनेतही त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. मात्र, जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. राज यांनी ९ ऑक्टोबर २००६ ला 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' (मनसे) या पक्षाची स्थापना केली. राज यांनी पक्ष सोडला असला तरी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या कौटुंबीक नात्यात मात्र दुरावा येऊ दिला नाही.
मनसेची स्थापना केल्यानंतर राज यांनी 'मराठी'चा आग्रह धरला. राज्यातील केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये मराठी तरुणांना प्राधान्य द्यायला पाहिजे यासाठी त्यांनी आंदोलन केले. राज यांच्या मनसे स्थापनेनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत अर्थात २००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाला आजपर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले होते. मनसेच्या पहिल्याच निवडणुकीत पक्षाचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र, हे यश राज यांना गेल्या दहा वर्षात परत पाहायला मिळाले नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज यांनी त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार उभा केलेला नव्हता. मात्र, त्यांच्या सभांची चर्चा देशभर झाली होती.
राज ठाकरे उत्कृष्ट वक्ता म्हणून ओळखले जातात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्यांच्या याच शैलीचा वापर करत भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले होते. भाजपने केलेल्या कामांची, मोदी सरकारच्या योजनांचे व्हिडीओ दाखवून 'लाव रे व्हिडीओ' म्हणत भाजप सरकारला सळो की पळो करून सोडले होते. त्यांच्या या भाषणाची दखल केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात घेतली गेली.