मुंबई Raj Thackeray on Toll Plaza : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील टोल वाढीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, सरकारला शेवटचा इशारा देखील दिलाय. राज्यातील टोल प्रश्नासंदर्भात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “माझा एकनाथ शिंदे यांना प्रश्न आहे, त्यांनी स्वत: टोल शुल्क वाढीविरोधात याचिका दाखल केली होती. मग त्यांनी ती मागे का घेतली? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला बोलवेल. पण, फडणवीस जे काही बोलत आहेत ते खरं असेल तर माझे कार्यकर्ते प्रत्येक टोल नाक्यावर उभे राहुन तपासणी करतील. टोल नाके बंद नाही झाले तर हे टोल नाके आम्ही जाळून टाकू," असा इशाराही राज ठाकरेंनी दिलाय.
पुन्हा लाव रे तो व्हिडिओ : राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक व्हिडिओ क्लिपही पत्रकार परिषदेत दाखवली. ज्यात स्वतः देवेंद्र फडणवीस टोल बंद झाले पाहिजेत असा मुद्दा उपस्थित करताना दिसत आहेत. यासोबतच राज ठाकरेंनी अजित पवारांचीही व्हिडिओ क्लिप जारी केली. एवढंच नाही तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचीही व्हिडिओ क्लिप लोकांसमोर मांडली, ज्यात उद्धव ठाकरे हे टोलमुक्त महाराष्ट्राबाबत बोलताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची क्लिप दाखवली ज्यात ते टोलमुक्त महाराष्ट्राबाबत बोलताना दिसत आहेत. त्यानंतर राज ठाकरे म्हणाले, "आता ज्या लोकांनी टोल मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी मागणी केली आणि आम्ही सत्तेत आल्यास टोल बंद करू अशी वक्तव्य केली त्या सगळ्यांनी सत्ता भोगली आहे."
तर टोल जाळून टाकू : राज ठाकरे पुढं बोलताना म्हणाले, "राज्यात दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना टोल माफ केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं, मग टोलच्या नावावर आजपर्यंत वसूल केलेली रक्कम गेली कुठं? एकतर राज्य सरकार खोटं बोलत आहे. टोल कंपन्या लोकांना लुटत आहेत. मी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना टोल माफ करण्याची मागणी करणार आहे. जसं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, टोल वसुली हा राज्यातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे. इतकी वर्ष टोल वसुली केलीत. तो पैसा गेला कुठं? एवढं करूनही टोल वसूल करायचाच असेल तर माझे महाराष्ट्र सैनिक टोल बुथवर उभे राहून वाहनं पुढे जाण्यास भाग पाडतील आणि तरीही संघर्ष झाला तर टोल बुथ जाळू, मग जे होईल ते होईल, असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय.
टोल टॅक्स हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा : अविनाश जाधव आणि इतर महाराष्ट्र सैनिकांनी मुंबईत 5 ठिकाणी टोल वाढीच्या विरोधात उपोषण सुरू केलं. आम्ही टोल विरोधात 2010 मध्ये जे आंदोलन सुरू केलं ते आजही सुरू आहे. प्रत्यक्षात टोलच्या पैशांचं काय झालं? टोलचं कंत्राट फक्त काही ठराविक कंपन्यांनाच का मिळते? एवढा टोल भरूनही रस्ते अत्यंत गलिच्छ असून कोणी का बोलत नाही? टोल टॅक्स हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप राज ठाकरेंनी राज्य सरकारवर केलाय. यासोबतच टोलच्या मुद्द्यावर सरकारने निर्णय न घेतल्यास टोल नाके जाळण्यात येतील, असंही राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा :