मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. सोमवारी ठाकरेंना भेटण्यासाठी चक्क तीन वर्षांची चिमुकली त्यांच्या निवासस्थानी आली. तसा तिने हट्टच आपल्या बाबाजवळ धरला होता. राज ठाकरेंजवळ ती मुलगी आल्यानंतर ठाकरे यांनीही तिला जवळ घेत पप्पी दिली व गोड खाऊही दिला. हे दृश्य असलेला व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होता आहे.
हेही वाचा - आठवलेंचा नवा नारा... म्हणून जागा झाला देश सारा
व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी तिच्या बाबांकडे मला राज ठाकरेंकडे न्या.. असा बालहट्ट तिच्या बाबांकडे करत असल्याचे ऐकायला येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खुद्द राज ठाकरेंनीच तिला भेटण्यासाठी आमंत्रण दिले होते. सोमवारी ही चिमुकली तिच्या आई-वडिलांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंजवर दाखल झाली.
नेहमीपेक्षा वेगळे राज ठाकरे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळाले असल्याच्या अनेकांनी भावना व्यक्त केल्या आहेत. मनसे कार्यकर्ते प्रफुल पाटील यांची तीन वर्षीय चिमुकली रुद्राणी ही ठाकरे यांची चाहती आहे.
नावाप्रमाणेच गोड असणाऱ्या रुद्राणीला पाहताच राज यांनी तिला मायेनं जवळ घेतलं. मला का भेटायच होत? असा प्रश्न विचारला. यावर चिमुकनं ठाकरेंच्या गालावर पप्पी दिली. त्यानंतर त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेऊन तिला आशीर्वाद दिला.