मुंबई - यावेळच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हायटेक प्रचार यंत्रणा राबवली होती. त्यांनी मोदी-शाह यांच्यासह भाजपवर जोरदार निशाणा साधत, ही जोडगोळी राजकीय क्षितीजावर दिसता कामा नये अशी भाषा केली होती. मात्र, त्यांच्या या प्रचारयंत्रणेचा भाजपला कुठेच फटका बसला नसल्याचे दिसून आले. निवडणुकीदरम्यान राज ठाकरेंनी राज्यात १० प्रचारसभा घेतल्या. मात्र, त्यांच्या प्रचारसभेतून मतपरिवर्तन झाल्याचे दिसून आले नाही.
राज ठाकरे यांनी या निवडणुकीमध्ये आपला एकही उमेदवार उभा केला नव्हता. ठाकरेंनी त्यांच्या सभांमधून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली होती. 'लाव रे तो व्हिडिओ' हे वाक्य प्रचारादरम्यान खूप गाजले होते. त्यांच्या प्रचाराचं स्वरुपही अतिशय हायटेक होते. मोदींची आश्वासनं, त्यांनी जाहीर केलेल्या योजना, त्याची आजची परिस्थिती काय आहे, याचे व्हीडिओ प्रेझेंटेशनच राज ठाकरे आपल्या सभांमधून केले होते.
राज ठाकरेंनी या १० ठिकाणी घेतल्या सभा
नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, महाड, खडकवासला, पनवेल, भांडुप, दक्षिण मुंबई आणि नाशिक या १० ठिकाणी प्रचारसभा घेतल्या होत्या. या ठिकाणी राज ठाकरेंच्या सभांचा काहीच चमत्कार झाला नाही. त्यांच्या सभांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता. मात्र, त्याचे मतात रुपांतर झाले नाही.
सभा घेतलेल्या ठिकाणी काय झाले
नांदेड
नांदेडमधून भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा ४० हजार मतांनी पराभव केला. या ठिकाणी राज ठाकरेंचा काहीच करिष्मा कामी आला नाही.
सोलापूर
सोलापूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होती. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर तर भाजपने डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. राज ठाकरेंच्या सभेचा सुशीलकुमार शिंदेंना फायदा होईल असे वाटले होते. मात्र, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी शिंदेचा तब्बल दिड लाखांच्या वर मतांनी पराभव केला.
इचलकरंजी
कोल्हापूर जिल्ह्यातील इचकरंजी येथेही राज ठाकरेंनी सभा घेतली होती. इचलकरंजी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येते. येथून स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्या विरोधात शिवसेनेचे धैर्यशील मानेंनी निवडणूक लढवली. यामध्ये धैर्यशील मानेंनी तब्बल १ लाख मतांनी राजू शेट्टींचा पराभव केला.
सातारा
साताराऱ्यामध्येही राज ठाकरेंनी जाहीर सभा घेतली होती. साताऱ्यातील राजकारण हे व्यक्तीकेंद्रीत आहे. तेथून राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले हे पुन्हा निवडणून आले. त्यांनी शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांचा पराभव केला. साताऱ्यात उदयनराजेंचा करिष्मा मोठा आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा त्यांना फायदा झाला असे म्हणता येणार नाही.
महाड
महाड हे रायगड लोकसभा मतदारसंघात येते. तेथून राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या अनंत गीतेंचा पराभव केला. तटकरेंनी ३१ हजार मतांनी गीतेंचा पराभव केला. येथे मात्र, राज ठाकरेंच्या सभेचा थोडाफार फायदा तटकरेंना झाल्याचे बोलले जात आहे.
खडकवासला
खडवाससामध्येही राज ठाकरेंनी प्रचारसभा घेतली. खडकवासला हे बारामती लोकसभा मतदारसंघात येते. हा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. येथून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंनी तब्बल दीड लाख मतांनी भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला. हा पवारांचा पारंपारिक मतदारसंघ असल्याने राज ठाकरेंचा त्यांना फायदा झाला असे म्हणता येणार नाही.
पनवेल
पनवेल हे मावळ लोकसभा मतदारसंघात येते. या ठिकाणीही राज ठाकरेंनी सभा घेतली होती. मावळमधून माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे होते. येथे सेनेच्या बारणेंनी पार्थ पवारांचा तब्बल २ लाखांच्या वर मतांनी पराभव केला.
भांडुप
भांडुप हे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येते. भांजुपमध्ये राज ठाकरेंनी सभा घेतली होती. मात्र, या सभेचा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना काहीच फायदा झाला नाही. येथून भाजपचे मनोज कोटक यांनी संजय पाटील यांचा दिड लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
दक्षिण मुंबई
राज ठाकरेंनी दक्षिण मुंबई मतदारसंघात घेतलेल्या सभेचा काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना काहीच फायदा झाला नाही. तेथून शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले. जवळपास १ लाख मतांनी सावंत यांनी देवरांचा पराभव केला.
नाशिक
नाशिकमध्ये राज ठाकरेंनी घेतलेल्या सभेचा राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना पायदा होईल असे वाटत होते. मात्र, त्यांचा शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी तब्बल अडीच लाखांहून अधिक मतांनी समीर भुजबळ यांचा पराभव केला.
राज ठाकरेंनी घेतलेल्या सभांमधील गर्दी मतांमध्ये परिवर्तित झाली नाही. शिवाय या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी एकच मुद्दा होता, तो म्हणजे मोदी हवेत की नकोत. मात्र, मतदारांनी मोदी हवेत या बाजूने कौल दिला.