मुंबई - पोर्नोग्राफिक कंटेट प्रकरणी अटकेत असलेला शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा याच्या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
- राज कुंद्राच्या कोठडीत वाढ -
पोर्नोग्राफी तयार करून ते काही अॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलैच्या रात्री अटक केली होती. २० जुलैला कुंद्राला न्यायालयात दाखल केल्यानंतर त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर कोठडीची मुदत 27 जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. आज (मंगळवार) राज कुंद्राच्या पोलीस कोठडीची मुदत संपली, तेव्हा त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी किला कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
शिल्पाच्या PNB खात्यावर क्राईम ब्रँचला संशय -
तपासादरम्यान मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला शिल्पा आणि कुंद्राच्या जॉईंट अकाऊंटची माहिती मिळाली. पंजाब नॅशनल बँकेत (PNB) उघडलेल्या या खात्यात वर्षात कित्येक कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. क्राईम ब्रँचला असाही संशय आहे, की Hotshots App आणि Bolly Fame App कडून मिळालेली रक्कम शिल्पा-राजच्या या खात्यावर पाठविण्यात येत होती.तपासात याचीही माहिती मिळाली आहे, की या खात्यात डायरेक्ट ट्रांजेक्शन होत नव्हते. तर वेगवेगळ्या मार्गाने छोट्या-छोट्या रक्कमेने पैसे ट्रान्स्फर केले आहेत. याला टेक्निकली भाषेत प्लेसमेंट, लेअरिंग, इंटिग्रेशनची मोडस ऑपरेंडी म्हणतात. दरम्यान, 23 जुलैला जेव्हा गुन्हे शाखेच्या पथकाने शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला तेव्हा तिची या विषयीही चौकशी केली गेली.
- राज कुंद्रांची अटक बेकायदेशीर -
वकीलराज कुंद्राचे वकील सुभाष जाधव म्हणाले, की 'माझ्या क्लायंटची अटक बेकायदेशीर आहे. कारण राज कुंद्रांच्या अॅपवरील कोणत्याही व्हिडिओला अश्लील म्हटले जाऊ शकत नाही. राज कुंद्रांविरोधात पोलिसांनी 4000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यात कलम 67 अ अंतर्गत कोणताही अश्लील व्हिडिओ बनविला गेला आहे हे ते कुठेही सिद्ध करू शकत नाहीत. ज्या कलमांखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे, त्यात त्यांना जामीन मिळतो'.
- 20 सप्टेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश -
पॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेला हायकोर्टाकडनं तूर्तास दिलासा दिला आहे. 20 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश दिले आहेत. अटकेच्या भितीनं शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे या बोल्ड अभिनेत्रींची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती.
- काय आहे नेमके प्रकरण -
राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या भावजीच्या मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अॅप होते. या कंपनीचे सर्व कॉन्टेंटची निर्मिती, या अॅपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुप, ई-मेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे.
- शिल्पाच्या अडचणीत वाढ !
राज कुंद्राच्या अटकेमुळे शिल्पाने सुपर डान्सर रिअॅलिटी शोचेही शुटींग थांबवल्याची माहिती आहे. राजच्या प्रत्येक व्यवसायात शिल्पा भागीदार असल्याची माहिती आहे. तसेच त्यामुळे शिल्पाला पण पोलिसांच्या चौकशीचा सामना करावा लागू शकतो. सध्या तरी या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा कोणताही सक्रिय सहभाग निदर्शनास आलेला नाही. पती राजमुळे शिल्पाचे बॉलिवूडमधील कमबॅक मात्र अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
- अशी झाली होती अटक
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी (दि. 19 जुलै) राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले होते. त्याच रात्री उशिरा शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा याला अटक करण्यात आली. त्याच्या अटकेच्या 10 तासानंतर नेरुळ परिसरातून रयान थारप याला या प्रकरणात अटक करण्यात आली. या दोघांना कोर्टाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आत्तापर्यंत राज कुंद्रासह 11 जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
- फेब्रुवारी 2021 मध्ये राज कुंद्रा विरोधात तक्रार दाखल -
राज कुंद्रा विरोधात फेब्रुवारी, 2019 मध्ये तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीमध्ये राज कुंद्रा अश्लील सिनेमे बनवत असून ते मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रसारित करत आहे, असे आरोप ठेवण्यात आले होते.
- राज कुंद्रा याला सात वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा -
अश्लील सिनेमे तयार करुन मोबाईलच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा याच्यावर भा.दं.वि. चे कलम 292, 293, 420, 34 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट यू/एस 2(जी), 3, 4, 6, 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमान्वये गुन्हा सिद्ध झाल्यास राज कुंद्राला सात वर्षांची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती अॅड. नितीन धांडोरे यांनी दिली.
- राज कुंद्रा मास्टर माईंड असल्याची पोलिसांची माहिती -
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा आणि त्याच्या भावाने ब्रिटनमध्ये एक कंपनी स्थापन केली होती. केनरिन असे त्या कंपनीचे नाव आहे. याच माध्यमातून अश्लील सिनेमे दाखवले जात होते. अश्लील चित्रपट भारतात शूट केले जात होते. त्यानंतर शूट केलेले व्हिडिओ विदेशात राज कुंद्रा आपल्या भावाला वी ट्रान्सफरच्या माध्यमातून पाठवत असे.