मुंबई - मुस्लीम धर्मियांमध्ये रमजान पवित्र असा सण मानला जातो. अशात महापालिकेच्या रुग्णालयांत येणाऱ्या मुस्लीम समाजातील रुग्णांच्या नातेवाईकांना रमजानच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात नमाज पठणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांनी वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य संचालकांकडे केली आहे.
मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना ७ मे पासून सुरू होत आहे. रमजानच्या काळात केईएम, शीव आणि नायर पालिकेच्या रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक भेटेल त्याठिकाणी नमाज अदा करतात. अनेक वेळा रुग्णांच्या नातेवाईकांना पालिकेच्या रुग्णालयात घाणीच्या ठिकाणी नमाज अदा करावा लागतो. त्यामुळे, रमजान या सणादरम्यान रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या मुस्लीम धर्मीय रुग्णांच्या नातेवाईकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात नमाजची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी रईस शेख यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन उम्मत फाऊंडेशन यांच्याकडून शेख यांच्याकडे आले आहे. या पत्रानुसार शेख यांनी वैद्यकीय संचालकांकडे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मुस्लीम धर्मीय रुग्णांसोबतच्या नातेवाईकांना नमाजाची परवानगी देण्याचे सूचित केले आहे.