मुंबई - शहरासह उपनगरामध्ये शनिवारी मुसळधार पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसाचे परिणाम अभियांत्रिकी आणि औषध निर्माण शास्त्र आदीच्या प्रवेश प्रक्रियेवरही झाले. पावसामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सेंटरमध्ये पोहोचता आले नाही. ही अडचण ओळखून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रवेशासाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यांनी ही माहिती ट्वीट करून दिली.
राज्यातील व्यवसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राज्य सीईटी सेलच्यावतीने राबविण्यात येत आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी कॅप राऊंड सुरु आहेत. मात्र गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी कॅप सेंटरमध्ये पोहोचण्यास शक्य झाले नाही. ही बाब ओळखून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तावडे यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीची मुदत दोन दिवस वाढवली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत कॅप सेंटरवर जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहेत.
दरम्यान, विद्यार्थांना फार्मसी अभ्यासक्रमाचे प्रवेश आज रविवार(28 जुलै ) संध्याकाळपर्यंत निश्चित करता येणार आहेत. अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र आदी अभ्यासक्रमाचे प्रवेश सोमवार(29 जुलै )पर्यंत निश्चित करण्यास, मुदत वाढ देण्यात आली आहे.