मुंबई - शहर आणि उपनगरात ऐन हिवाळ्यात गुरुवारी पहाटेपासून रिमझिम पाऊस पडत आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लोक बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत आले आहेत. वांद्रे, खार, सांताक्रूज, विलेपार्ले, अंधेरी परिसरात अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. येत्या २४ तासात अरबी समुद्रात एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परिणामी वातावरणात झालेल्या बदलामुळे मुंबईत आज पावसाने हजेरी लावली आहे.
पुर्व मध्य अरबी समुद्रात आणि दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावी क्षेत्राचे रूपांतर गुरुवारी दुपापर्यंत चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. पवन आणि अम्फन अशी नावे या वादळांना देण्यात आली आहेत. या चक्रीवादळांच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या काळात किनारपट्टीवर ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारी मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
हेही वाचा - उसाच्या रसातून विषबाधा झाल्याचे भासवून विक्रेत्याला 45 लाखांना लुटले; आरोपी अटकेत
कयार आणि महा चक्रीवादळांनंतर पुन्हा तशीच स्थिती अरबी समुद्रात निर्माण झाली आहे. यंदा अरबी समुद्रात चार, तर बंगालच्या उपसागरात तीन अशी सात चक्रीवादळांची निर्मिती झाली. त्यात पवन व अम्फन यांची भर पडल्यास एकूण चक्रीवादळांची संख्या नऊ होईल. पवन चक्रीवादळ सोमालियाच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. प्रथम उत्तर-पश्चिम दिशेला व नंतर पश्चिम दिशेने हे वादळ पुढे सरकेल. तर अम्फन वादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिण गुजरातच्या विविध भागात येत्या २४ तासात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.