मुंबई Rain wreaks havoc in Nagpur : नागपुरात काल रात्रीपासून पडणाऱ्या धो धो पावसाने हाहाकार माजला आहे. आतापर्यंत १०९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अनेक भागांमध्ये पाणी साचून जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या निमित्ताने मुंबई दौऱ्यावर असल्याकारणाने उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस हे मुंबईत आहेत. परंतु मुंबईतून ते नागपुरातील एकंदरीत सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून सातत्याने याचा आढावा घेत आहेत. याबाबत त्यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला, नागपूर मधील एकंदरीत परिस्थितीची माहिती दिली.
२ तासात ९० मिलिमीटर पाऊस - याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर मध्ये काल रात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत प्रचंड मोठा पाऊस झाला. ढगफुटी सदृश्य हा पाऊस होता. चार तासांमध्ये १०९ मिलिमीटर इतका पाऊस झाला. त्यातील ९० मिलिमीटर मिलिमीटर पाऊस हा केवळ २ तासांमध्ये झाला आहे. म्हणून पावसाची प्रचंड तीव्रता आपल्याला तिथे बघायला मिळत आहे. यामुळे अंबाझरी तलाव हा ओव्हरफ्लो झाला आहे व याच्या ओव्हरफ्लोचं पाणी हे नाग नदीतून वाहत आहे. या कारणाने नाग नदीला मोठा पूर आल्यासारखी स्थिती निर्माण झाली असून नाग नदीच्या किनाऱ्यावर भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरलं आहे. काही ठिकाणी तळमजल्यापासून पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचलं आहे. नागपूरच्या मुख्य बस स्थानकामध्ये बसेसच्या वरपर्यंत पाणी शिरलेलं आहे.
वृद्ध महिलेचा मृत्यू - फडणवीस पुढे म्हणाले की, नागपूरचे महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी सर्व प्रशासकीय टीम ही पूर्णपणे कार्यरत आहे. एनडीआरएफ च्या २ एसडीआरएफ च्या २ व मिलिटरीच्या २ अशा ६ टीम तिथे तैनात केल्या आहेत. एनडीआरएफ व एसडीआरएफ टीमने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. मिलिटरीच्या २ टीम राखीव ठेवल्या आहेत. ४०० नागरिकांना बाहेर काढून त्यांच्यासाठी बेस कॅम्प तयार करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी ज्या काही सोयी सुविधा लागणार आहे त्या करण्यात येत आहेत. पाणी आता उतरू लागले असले तरी सध्या बऱ्याच भागात पाणी साचलेलं आहे.
प्रशासन पूर्णपणे जागृत - शंकर नगरचं कर्णबधिर विद्यालय आहे, तेथील मुलांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मेडिकल कॉलेजमधील मुलींना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. दुर्दैवाने एका वरिष्ठ नागरिकाचा (आजींचा) मृत्यू झाला आहे. शाळा, महाविद्यालयाना सुट्टी देण्यात आली आहे. प्रशासन पूर्णपणे जागृत असून त्या ठिकाणी पाहणी करून पंचनामे करणे, तात्पुरती मदत करणे या सर्व गोष्टी करण्यात येत आहेत.
सायंकाळी नागपूरला जाणार - आतापर्यंत ७० जनावरांचा मृत्यू झाला असून लोकांना इतकीच विनंती आहे की, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन फडणवीस यांनी केलं. काही अडचण असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा. मी सातत्याने संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहे. जे काही मार्गदर्शन करायचं आहे, ते करत आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे स्वतः या सर्व भागाचा दौरा करत आहेत व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. मी स्वतः सायंकाळी त्या ठिकाणी जाणार असल्याचंही देवेंद्र फडवणीस यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा....
Nagpur Rain : नागपुरात पावसाचा हाहाकार; शाळांना सुट्टी जाहीर, भारतीय सैन्याकडून मदतकार्य
Nagpur Rain : नागपुरात ढगफुटी सदृश पाऊस; घरांमध्ये शिरलं पाणी, पाहा व्हिडिओ