मुंबई - जगभरात कोरोनाचे संकट आले आहे. देशासह राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. उद्योगपती, प्रख्यात व्यक्ती, व्यापारी या काळात लोकांची मदत करत आहेत. यादरम्यान, रेल्वेचा एक कर्मचारीसुद्धा लोकांची काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे. नागपूर येथील मध्य रेल्वे, वाणिज्य विभागात कार्यरत असणारे खुशरू पोचा हे कोणतीही देणगी न घेता हजारो लोकांना अन्न देण्याचे कार्य करत आहेत.
आपला स्वभाव, वैयक्तिक आणि व्यावसायिक संपर्क सोशल मीडियाच्या माध्यमातून वापर करत त्यांनी 40 लाख रुपयांहून अधिक किंमतीचे अन्न आणि मदत साहित्य गोळा केले आहे. 6,000 हून अधिक कुटुंबीयांना त्याचा फायदा झाला आहे. त्यांनी आतापर्यंत 60 हजारापेक्षा अधिक गरिबांना दोन टन तांदूळ उपलब्ध करून दिला आहे.
सध्या सुरू असलेल्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी खुशरू पोचा हे व्हॉट्सअॅप ग्रुप आणि त्यांच्या वेबसाइटद्वारे मदत व विनंत्या करत आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी खुशरू पोचा यांचे कौतुक केले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे वैयक्तिकरित्या संपर्क साधला आणि गरिबांना मदत करण्याच्या त्यांच्या कार्याची माहिती घेतली.