मुंबई - आज पहाटेपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबई शहराला पहिलाच पावसाने पुरते झोडपुन काढले. या पावसामुळे मध्य रेल्वे वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहे. सायन ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या जागीच खोळंबल्या आहे. तसेच खबरदारी म्हणून मध्य रेल्वेने सीएसएमटी ते कुर्ला दरम्यानच्या सर्व लोकल सेवा बंद केली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी लोकल गाड्यात अडकून पडले आहेत.
सीएसएमटी ते कुर्ला लोकल सेवा बंद -
महाराष्ट्रासह मुंबई आणि इतर भागात मंगळवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मुंबईत रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज मान्सूनचे मुंबईत आगमन झाले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसलेला आहे. सकाळीपासून ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गवरील सकाळी 9 वाजेपर्यत वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मात्र, सायन ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या जागीच खोळंबल्या आहे. खबरदारी म्हणून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 9 वाजून 50 मिनिटांनी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान लोकल सेवा बंद केली आहे. तसेच हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्याचा लोकल सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत.
हेही वाचा - मान्सून मुंबईत दाखल; रात्रीपासून बरसतोय जोरदार पाऊस
रेल्वे प्रवाशांचे हाल -
मध्य रेल्वे मार्गावरील अनेक लोकल गाड्या रेल्वे स्थानकात आणून त्या रद्द करण्यात आल्याची घोषणा रेल्वेने केल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाण्यात अडकलेल्या लोकल गाड्यांमधून खाली उतरुन पाण्यातून वाट काढत प्रवाशांनी जवळचा रस्ता गाठण्याचा प्रयत्न केला. तर अनेकांनी बसने प्रवास करण्यास प्राधान्य दिले. मात्र, पहिल्याच पावसात रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा वाजल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकरांची गैरसोय झाली आहे. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवेतील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यलयात पोहण्यासाठी लेट मार्क लागलेला आहे. पावसामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा 15 ते 20 मिनिटांनी उशिरा धावत आहे.
रस्ते वाहतुक मंदावली -
शहरातील अनेक रस्ते पावसाच्या पाण्याच्या खाली गेल्याने रस्ते वाहतुक पुर्णपणे मंदावली. पुर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गावर देखील गाड्यांच्या रांगा लागल्या. सायन-पनवेल हायवेवर देखील वाहतुकीची कोंडी झाली. लोकलच्या गोंधळामुळे अनेकांनी रस्ते वाहतुकीचा पर्याय स्वीकारला परंतु रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला. अनेक भागात पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने बेस्टच्या अनेक बसेस पाण्यात अडकल्या. त्यामुळे अनेक बेस्टचा बसेसचे मार्ग वळविण्यात आले आहे.
हेही वाचा - रायगड जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू; जनजीवन विस्कळीत