मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून मुंबई रेल्वेकडे पाहिले जाते. मात्र रेल्वे प्रवासादरम्यान धावती गाडी पकडताना किंवा रेल्वे रूळ ओलांडताना अनेक दुर्घटना घडतात. अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यावर बोरिवली रेल्वे पोलिसांनी जनजागृती केली. पोलिसांनी साक्षात यमराजाचे कपडे घालून जनजागृती केली.
यमराज अवतरले : मात्र आता अशा अपघातांना आळा घालण्यासाठी बोरिवली रेल्वे पोलिसांनी एक शक्कल लढवली. याच संदर्भात आज जनजागृती करण्यात आली यावेळी रेल्वे पोलिसांनी साक्षात यमराज यांना प्लॅटफॉर्म वरून फिरवत यापुढे जो कोणी रेल्वे रुळ ओलांडणार, धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करणार किंवा रेल्वेतून प्रवास करताना स्टंट करणार अशा व्यक्तीला थेट यमराज उचलणार अशी मोहीम राबवत जनजागृती करण्यात आली.यावेळी अचानक यमराज प्लॅटफॉर्मवर अवतरल्यामुळे प्रवासी देखील चक्रावून गेले. मात्र जनजागृती करताना होणारी अनाउन्समेंट ऐकताच उपस्थित असलेल्या प्रवाशांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले.
मोठ्या प्रमाणात लोकसंख्या : मुंबईत मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानकाभोवती सकाळ व सायंकाळच्या वेळेस वाहतूक कोंडी होते. हे चित्र मुंबईतल्या प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाहायला मिळते. यामुळे मोठ्या दुर्घटना घडत आहेत. यामुळेच नागरिकांविषयी आपुलकी जपत, एरवी स्टेशनवर व ट्रॅकवर पहारा देणाऱ्या रेल्वे पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे.
सीएसएमटी स्थानकावर जनजागृती : पोलीसांनी प्रवास करते वेळी लोकांनी काय करावे याबाबत जनजागृती केली होती. याविषयी मार्गदर्शन पत्रक व पोस्टर हातात घेऊन, काळजी घेण्याचे आवाहन केले होते. रेल्वे पोलीस जनतेला रेल्वे प्रवासादरम्यान डाव्या बाजूने चालावे, गर्दी झाल्यास काय करावे, यासह इतर मार्गदर्शन केले होते. हा कार्यक्रम रोज सायंकाळी मुंबईतील विविध स्थानकात फिरून संपूर्ण एक महिनाभर करण्यात येणार आहे.