मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना भारतीय रेल्वेच्या सर्व रेल्वे गाड्या हळू हळू रेल्वे रुळावर येत आहेत. अशात आता लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या तिकिटांचा काळाबाजार सुरू झाला आहे. त्याच्याविरोधात कारवाई करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने कंबर कसली असून, नुकतेच आरपीएफने भिवंडी परिसरातून दोन दलालांना पकडून त्यांच्याकडून 71 हजार 287 रुपयांची तिकीटे जप्त केली आहेत.
हेही वाचा - राज्यपालांच्या सचिवांनी माहिती दडवल्याने खोळंबा; राज्य सरकारचे स्पष्टीकरण
दोन तिकीट दलालांना अटक
लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये मध्य रेल्वेने विशेष आणि उत्सव रेल्वे गाड्या चालविल्या. या रेल्वे गाड्यांच्या तिकिटांचा काळाबाजार मोठ्या प्रमाण सुरू असल्याने तिकीट दलालांना पकडण्याकरिता रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील भिवंडी रेल्वे परिसरातून अवैधपणे 11 वैयक्तिक आयडीचा उपयोग करून रेल्वे आरक्षणाच्या ई-तिकिटांच्या विक्रीत गुंतलेल्या दोन दलालांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध रेल्वे कायद्यानुसार गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.
71 हजार 287 रुपयांची तिकिटे जप्त
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या या दोन तिकीट दलालांकडून पोलिसांनी सीपीयू, मॉनिटर, एक मोबाईल, 3 लॅपटॉपसह 30 हजार 725 रुपये किंमतीची 20 प्रवासाची ई-तिकिटे आणि 40 हजार 562 रुपये किंमतीची 38 मागील प्रवासाची ई-तिकिटे, अशी एकूण 71 हजार 287 रुपयांची तिकिटे जप्त केली आहेत. दोन्ही आरोपींवर रेल्वे कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
या मोहिमेत भिवंडी रोड आरपीएफ पथकातील सहाय्यक उपनिरीक्षक प्रशांत चौधरी, सहाय्यक उपनिरीक्षक अनवर शहा, हेड कॉन्स्टेबल विनोद राठौर, कॉन्स्टेबल नीलकंठ गोरे यांचा सहभाग होता. प्रवाशांनी अधिकृत रेल्वे तिकिटांवर प्रवास करावा. प्रवाशांनी www.irctc.co.in या संकेतस्थळावर रेल्वे तिकीट आरक्षित करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - शिक्षक आक्रमक : मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आत्मदहन करण्याचा इशारा