मुंबई - दक्षिण-मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जागोजागी केक कापून शेवाळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दरम्यान, चैत्यभूमी, दादर येथे केक कापण्याचा त्यांचा मानस वेळीच आवरल्याने शोभा टळली.
महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले आज चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करायला आले. यावेळी समन्वय समितीच्यावतीने राहुल शेवाळे यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु आचारसंहिता भंग आणि जनतेच्या तीव्र भावना ओळखून चैत्यभूमीवर केक कापण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
१४ एप्रिल या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी राहुल शेवाळे यांचाही वाढदिवस असतो. मात्र, लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना वाढदिवस साजरा करण्यापेक्षा प्रचाराला वेळ देण्यास शेवाळे यांनी पसंद केले. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास देवनार परिसरात प्रचारफेरीला सुरुवात झाली. मात्र, मध्येच प्रचारफेरीत काही नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी शेवाळे यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीत केक कापून शेवाळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अशाच रीतीने सुमारे ५ ते ६ ठिकाणी शेवाळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.