मुंबई : आषाढी वारीनिमित्त सारी पंढरी गजबजली आहे. सगळीकडे चैतन्याचे भक्तिमय वातावरण आहे. वारकऱ्यांमध्येदेखील उत्साह दिसत आहे. श्री विठ्ठल भक्तांनादेखील माऊलीची ओढ लागली आहे. आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक आणि वारकरी दिंड्यांच्या आणि पालख्यांच्या माध्यमातून पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या या लाखो भाविकांच्या आणि वारकऱ्यांसाठी राज्य सरकार सर्व सुविधा पुरवण्यास सज्ज आहे. वारी मार्गामध्ये ठिकठिकाणी शौचालय आणि स्नानगृहे सरकारने उभारली आहेत. त्याचा लाभ या सर्व वारकऱ्यांना झाला आहे. प्रशासनाने वारकऱ्यांसाठी आरोग्य आणि स्वच्छता याबाबत पुरेशी काळजी घेतली आहे. वारकऱ्यांची कुठेही गैरसोय होणार नाही याबाबत राज्य सरकार दक्ष असल्याचे, विखे पाटील यांनी सांगितले.
समन्वय समितीच्या माध्यमातून आढावा : पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी टाळ मृदंगाच्या गजरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सोयी सुविधा योग्य रीतीने पुरवता याव्यात. त्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि स्वच्छतेची पुरेशी काळजी घेता यावी यासाठी, राज्य सरकारच्या वतीने एक समन्वय समिती नेमण्यात आली आहे. या समन्वय समितीमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचाही समावेश आहे. तिघांनी मिळून या सर्व सोयी सुविधांचा सातत्याने आढावा घेतला आहे. त्यामुळे कुठेही वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे, विखे पाटील यांनी सांगितले.
महिलांसाठी चार हजार स्वच्छतागृहे : दिंड्यांमधून आणि पालख्या मधून पंढरपूरच्या दिशेने येणाऱ्या हजारो महिला वारकरी आणि भाविकांसाठी जागोजागी स्वच्छतागृहे आणि स्नानगृहे उभारण्यात आली आहेत. महिलांसाठी 4000 स्वच्छतागृह आणि स्नानगृह उभारण्यात आली आहे. त्यामुळे महिला वारकऱ्यांची योग्य सोय झाली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात दाखल झालेल्या दोन्ही मानाच्या पालकांचे स्वागत करता आले. पंढरपुरात येणाऱ्या सर्व वारकरी आणि भाविकांचे आपण स्वागत करत असून, त्यांच्या सोयी सुविधांमध्ये कुठेही कमतरता होणार नाही, याची दक्षता वारी पार पडेपर्यंत घेतली जाणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
केसीआर यांच्या दर्शनाचा परिणाम नाही : दरम्यान यासंदर्भात बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, केसीआर हे केवळ देवदर्शनासाठी आले होते. पंढरपूरला देवदर्शनासाठी आलेल्या एखाद्या नेत्याला किती महत्त्व द्यायचे हा वेगळा प्रश्न आहे. विठुरायाच्या दर्शनाला येताना त्यांनी केलेले शक्ती प्रदर्शन आणि निर्माण केलेली हवा ही आता विरून गेलेली आहे. त्याने फार तर काँग्रेस राष्ट्रवादीतील काही नाराज लोक त्यांच्या गळाला लागतील. मात्र राज्यात फार काही फरक पडेल आणि राज्यात सत्तेवर असलेल्या शिंदे फडणवीस आघाडी सरकारला त्यापासून काही धोका होईल, अशी अजिबात परिस्थिती नाही असा दावा विखे पाटील यांनी केला आहे.
पंढरपूरला देवदर्शनासाठी आलेल्या एखाद्या नेत्याला किती महत्त्व द्यायचे हा वेगळा प्रश्न आहे. केसीआर यांच्या दर्शनाचा राज्यात सत्तेवर असलेल्या शिंदे फडणवीस आघाडी सरकारला त्यापासून काही धोका होईल, अशी अजिबात परिस्थिती नाही - पालकमंत्री विखे पाटील
केसीआर यांना म्हणावा तितका प्रतिसाद नाही : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी महाराष्ट्रातील सीमावरती भागामध्ये आपला जम बसवायला सुरुवात केली असली तरी, प्रत्यक्षात केवळ दुसऱ्या फळीतली काही मंडळी केसीआर यांच्या पक्षात सामील होतील, बाकी पहिल्या फळीतील काही नेते केसीआर यांच्या पक्षाकडे फिरणार नाहीत, अशी परिस्थिती सध्या तरी महाराष्ट्रात आहे. कारण महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना अंतिम क्षणी पर्याय मिळाला नाही तरच ते केसीआर यांच्या पक्षाकडे वळतील, मात्र हे चित्र सध्या नसल्याने जागा वाटपाबाबत कुठल्याच पक्षाचे काही स्पष्ट झाले नसल्याने, केसीआर यांना थोडी वाट पाहावी लागेल अशीच परिस्थिती आहे. असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -
- Ashadhi Wari 2023: संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन, रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला
- Bandu Jadhav Criticized on CM: आषाढी वारीत वारकऱ्यांचे हाल अन् सरकार मात्र जाहिरातीत मग्न- खासदार संजय उर्फ बंडू जाधव
- Ashadhi wari 2023: सात वेळा केला रायगड सर, 80 वर्षीय आजी वारीत सहभागी, जाणून घ्या त्यांचा अनुभव