मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील सर्व मंत्र्यांना खातेवाटप झाल्यानंतर सरकारची गाडी रुळावर आली आहे. दैनंदिन मंत्रालय कामकाजात तीनही पक्षांचे समर्थक, कार्यकर्ते आणि कामासाठी येणाऱ्यांनी मंगळवारी मंत्रालयात एकच गर्दी केली होती. शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला. मात्र, सर्वसामान्य नागरिकांची रांगेत उभे राहून कुचंबणा होत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले तसे मुख्यमंत्री कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात उभे राहिल्यास मंत्रालयातील काम कमी होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा- विधान परिषद : महाविकास आघाडीकडून संजय दौंड यांचा उमेदवारी अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि त्यानंतर सत्तास्थापनेसाठी लागलेला प्रदीर्घ काळ यामुळे मंत्रालयात विविध शासकीय कामांसाठी मुंबईसह राज्यभरातून येणाऱ्यांची संख्या रोडावली होती. मात्र, मंगळवारी मंत्रालयात आपापल्या भागातील तीनही पक्षांच्या मंत्र्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी व त्यांची भेट घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती. मंत्रालयाच्या इमारतीत प्रवेशासाठी नागरिक आणि तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या रांगा लागल्या होत्या. गार्डन गेटजवळ अभ्यागतांच्या वाहनांची वर्दळ होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत होती. मंत्रालय परिसरात दुपारनंतर काही वेळासाठी वाहतुकीकोंडी झाली होती. मंत्रालयाचे नियमित कामकाज सकाळी दहा वाजता सुरू होत असले तरीही अभ्यागतांना दुपारी दोन नंतर प्रवेश दिला जातो.
हेही वाचा- ठेवीदार संकटात; बंगळुरुमधील 'या' सहकारी बँकेवर आरबीआयचे आर्थिक निर्बंध
दुरुस्तीच्या कारणास्तव सध्या नागरिकांसाठी गार्डन गेटमधून प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे सकाळपासून नागरिक मोठ्या संख्येने रांग लावून प्रवेश पत्र घेण्यासाठी येतात. या सरकारच्या काळात नागरिकांची गर्दी वाढल्याने मंत्रालय गार्डन प्रवेशद्वारापासून आकाशवाणी आमदार निवासात पर्यंत ही प्रवेशाची रांग लागल्याचे दिसत आहे. या रांगेत ६० वर्षाचे प्रमोद रंगारी भेटले. हातातली काठी टेकवत ते भंडाऱ्यावरुन मंत्रालयात पोहोचले. त्यांच्या ५ कामांसाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयांच्या खेटा घालत आहेत. मंत्रालय प्रवेशासाठी अडथळे ठेवण्याऐवजी थेट प्रवेश द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. आमच्या जिल्ह्यात हे मुख्यमंत्री कार्यालय सुरू झाल्यास आम्हाला मुंबईत महसुली कामांसाठी यावे लागणार नाही, अशी भावना मुंढवा पुणे येथील रहिवाशी संकेत गायकवाड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.
आता खऱ्या अर्थाने अस्तित्वात आलेले तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार अंतर्गत कुरबुरी संपवून लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या मागे लागेल, अशी प्रतीक्षा या सामान्य जनतेला आहे. "गरिबांची कामे केली तर सरकार, नाही तर त्या सरकारचा काय उपयोग" अशी रांगेत उभ्या असलेल्या आजोबांनी व्यक्त केलेल्या भावनेचा आदर हे सरकार करेल, अशी आशा आहे. अन्यथा या निवडणुकीत जनतेचा कौल काय करू शकतो हे त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलेच आहे. याचा विसर पडणार नाही म्हणजे झाले.