मुंबई- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला खासदार इम्तियाज जलील गैरहजर राहिले. जलील यांना मुक्ती संग्राम दिनाचे वावडे आहे. त्यांच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली आहे.
आज औरंगाबाद शहरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. मात्र औरंगाबादचे खासदार जलील हे यावर्षी देखील कार्यक्रमाला गैरहजर राहिले. यावरून त्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे वावडे असल्याचे दिसत असल्याची टीका कायंदे यांनी केली आहे.जलील अजूनही स्वतःला निजामाचे गुलाम समजतात काय? असा सवालही त्यांनी केला.
हेही वाचा- मुंबईत ६७२ कोटी खर्च करून शीव रुग्णालयाच्या तीन नवीन इमारती बांधणार
जलील यांना जर मराठवाडा मुक्ती संग्रामचे वावडे असेल तर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. आणि सरकारने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कायंदे यांनी केली आहे. गेले अनेक वर्षे आमदार असतानाही आणि आता खासदार असताना देखील इम्तियाज जलील या कार्यक्रमाला गैरहजर राहिले आहेत. ज्या हुतात्म्यांनी आपले रक्त सांडवून निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त केला, त्या पवित्र आत्म्यांना अभिवादन करणे त्यांना मान्य नाही का, असा सवाल आमदार मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे.