मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फेसबुकवर धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हे शाखेने रविवारी पुण्यातील ३४ वर्षीय आयटी अभियंत्याला अटक केली. सागर बर्वे असे आरोपीचे नाव असून त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी फेसबुक आणि ट्विटरसह सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या अगोदर शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप हा अमरावतीतील भाजप कार्यकर्त्यावर ठेवण्यात आला होता. सौरभ पिंपळकर नावाच्या तरूणाने ट्विटरवरुन पवारांना धमकी दिली, असा आरोप केला गेला होता, पोलीस तपास करत होते.
सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी : २०१३ मध्ये मारल्या गेलेल्या नरेंद्र दाभोलकरांना शरद पवार लवकरच भेटतील, अशी फेसबुक पोस्ट सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी वाचली. फेसबुकच्या धमकीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमरे नावाच्या कार्यकर्त्याने शुक्रवारी लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान, ज्या आयपी अॅड्रेसवरून पोस्ट अपलोड करण्यात आली होती, तो बर्वे याचा असल्याचे गुन्हे शाखेला आढळून आले. ट्विटरवर धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
शरद पवार यांची प्रतिक्रिया : शरद पवार यांना 9 जून रोजी सोशल मिडियावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी शरद पवार यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. धमकीची चिंता करत नसल्याचे ते म्हणाले होते. अजित पवार यांनी पोलीस खात्याला कठोर कारवाई करण्याचे आवाहन देखील केले होते. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना देखील अज्ञात व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकी प्रकरणानंतर शरद पवार आणि संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
हेही वाचा :