मुंबई - कोरोना संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून ५० लाख आर्थिक मदत देण्यात यावी, अशी आग्रही मागणी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.
मार्च २०२० पासून कोरोना महामारीच्या काळात शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक, लाखो परप्रांतीय मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन सुखरूप पोहचवणे, हजारो विद्यार्थ्यांना परराज्यातून त्यांना सुखरूप घरी घेऊन येणे, हजारो ऊस तोडणी मजुरांना कारखान्यापासून त्यांच्या घरापर्यंत घेऊन जाणे, अत्यावश्यक व कृषिजन्य मालाची वाहतूक करणे, वैद्यकीय ऑक्सिजन आणण्यासाठी टँकरला चालक पुरविणे, शासकीय रुग्णवाहिकांना चालक पुरविणे अशा अनेक कामामध्ये धोका पत्करून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपली सेवा बजावलेली आहे. कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, परिचारिका, पोलीस या सारख्या कोरोना योध्यांच्या खांद्याला खांदा लावून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी देखील शर्तीचे प्रयत्न केले आहे. दुर्दैवाने या काळात अनेक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच हजारो कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत.
एसटी महामंडळाने शासनाच्या निर्देशानुसार त्यांनी घालून दिलेल्या नियम व अटी शर्थीच्या अधीन राहून ३१ डिसेंबर २०२० अखेर मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांपैकी १० कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची मदत महामंडळाच्या आर्थिक निधीतून केली आहे. दुर्दैवाने इतर मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना देखील आर्थिक मदत करण्याची इच्छा असून देखील महामंडळाच्या आर्थिक अडचणीमुळे मदत करणे शक्य होत नाही. त्यामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून ५० लाख रुपयाची त्यांच्या वारसांना मदत करण्यात यावी, अशी आग्रही मागणी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे केली आहे.