मुंबई - मराठा आरक्षण हे नियमबाह्य असल्याचे सांगत राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या लालबाग परिसरात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यात अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच, आरक्षण न मिळाल्यास हजारोंच्या संख्येने आंदोलन करू, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला.
हेही वाचा - मनोरा आमदार निवास पुनर्विकास अखेर मार्गी; बांधकामासाठी 900 कोटींची मागवली निविदा
सध्या कोरोनाची परिस्थिती आहे म्हणून प्रतिकात्मक आंदोलन म्हणून कमी संख्येने आम्ही जमलो आहोत. मात्र, येत्या काळात हजारोंच्या संख्येने आंदोलन करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राजन घाग यांनी दिला.
राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीर, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज निकाल सुनावला.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीस हेच आरक्षण कायद्याच्या विरोधात; नवाब मलिक यांचा आरोप