मुंबई- हैदराबाद येथे एका डॉ. तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेविरोधात सर्वत्र देशवासीयांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी देशातील विविध शहरात मोर्चे व विरोध प्रदर्शन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे व अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच पीडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली.
रविवारी संध्याकाळी नवी मुंबईच्या वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कँडल मार्च काढून हैदराबादमधील पीडित डॉ. तरुणीला श्रद्धांजली वाहण्यात आली. या कँडल मार्चमध्ये शहरातील महिला आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता. नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशा मागणीचे फलक हातात घेऊन महिला व पुरुषांनी घोषणाबाजी केली होती.
ठाण्यात काढण्यात आला निषेध मोर्चा
या घटनेविरुद्ध ठाणे शहरातही निषेध मोर्चा काढण्यात आला होता. रविवारी सायंकाळी शिवनलिनी प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून कामगर पोलीस ठाण्यापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली, तर कल्याणमध्ये कल्याण पूर्वेतही स्त्री मुक्ती सामाजिक संघटनेने मोर्चा काढला होता. यामध्ये शिवसाधना समूह, जनहीत प्रतिष्ठान या संस्थांनी सहभाग घेतला. यावेळी 'फासी दो फासी दो', 'बलात्कारी को फासी दो', 'न्याय दो न्याय दो', 'पीडिता को न्याय दो', अशा घोषणा देण्यात आल्या. यामध्ये प्रतिष्ठानचे महाव्यवस्थापक अनिरूद्ध कुलकर्णी, अॅड प्रदिप बावस्कर, अॅड ज्योती परब आणि आदी लोकांनी सहभागी होवून कायद्यात सुधारणा करून तातडीने आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. याचसोबत बलात्काराच्या घटना कल्याण-डोंबिवलीत घडू नये यासाठी विशेष उपाययोजना करून गर्दुल्ले, दारूडे व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदवनाद्वारे करण्यात आली.
कल्याण पूर्वेतही घटनेचा निषेध
याच पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेतही स्त्री मुक्ती सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा वर्षा कळके यांच्यासह श्वेता इंगळे, राजेंद्र सटाळे, सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. सद्या दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. त्यामुळे समाजात वावरताना जागरुकता असणे आवश्यक आहे. हैदराबादमध्ये झालेल्या या घटनेचा निषेध व समाजात जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी कल्याण पूर्वेतील स्त्री मुक्ती सामाजिक संस्थेमार्फत रविवारी सायंकाळी केडीएमसी वॉर्ड ऑफिसपासून ते विठ्ठलवाडी रिक्षा स्टॅन्डपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अमरावतीतही घटनेचा निषेध
बलात्कार पीडितेच्या मारेकऱ्यांना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, ही मागणी करत अमरावतीतील परतवाडा येथे शोकाकूल वातावरणात, मेणबत्ती लावून तिला सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. बलात्कार करून जिवंत जाळणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी देखील नागरिकांनी केली.
हेही वाचा- शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊ शकते तर, राजकारणात अशक्य काय? - फडणवीस