मुंबई - येथील महापौरांनी एका महिलेचा हात पिरगळून धमकी दिली. यानंतर त्या महिलेचा दुसरा व्हिडिओ बनवून असे काही झाले नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला जोतोय. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण व काँग्रेसच्या मुंबई महिला अध्यक्षा अजंता यादव यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन केले आहे.
आझाद मैदानात महापौर, शिवसेना आणि सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महापौरांवर कारवाई न केल्यास पुढील आंदोलन वर्षा बंगल्यावर करू, असा इशारा आमदार विद्या चव्हाण यांनी दिला. तर महापौरांवर ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल करावा, तसेच महापौरांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या मुंबई महिला अध्यक्षा अजंता यादव यांनी केली.
मुंबईच्या महापौरांनी एका महिलेचा हात पकडून पिरगळून धमकी देण्याचा प्रकार सांताक्रूझ येथे घडला होता. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर महापौरांवर टिका होत होती. या टिकेमुळे शिक्षक असलेल्या महापौरांना वांद्रे पूर्व येथून विधानसभा निवडणूकीत तिकीट मिळणे मुश्किल झाले होते. यामुळे ही टिका बंद करण्यासाठी 'त्या' महिलेचा दुसरा व्हिडिओ बनवून असे काही झाले नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. यावेळी महापौर हाय हाय, चोर है भाई चोर है महापौर चोर है, मुख्यमंत्र्यांनी महापौरांची हकालपट्टी केलीच पाहिजे, महिलांवर दबाव आणलेल्या शिवसेनेचा धिक्कार असो, शिवसेना मुडदाबाद आदी घोषणा देण्यात आल्या.
तर वर्षा बंगल्यावर आंदोलन करू -
महापौरांनी एका महिलेचा हात पिरगळला तेव्हा पासून राष्ट्रवादी, काँग्रेस, जनता दल, डाव्या पक्षांकडून आंदोलन केले जात आहे. महापौरांच्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला हे वर्तन शोभणारे नाही. आज शिवसेनेने कळस गाठला आहे. त्यांनी त्या महिलेवर दबाव आणून असे काही झाले नसल्याचा व्हिडीओ तयार करुन घेतला आहे. महिलांवर दडपशाही आणण्याचे काम शिवसेना करत आहे. महापौरांची हकालपट्टी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. महापौरांवर कारवाई न झाल्यास यापुढचे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी दिला.
कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार -
तर महापौरांनी महिलेचा हात मुरगळला ही सत्य घटना आहे. हे सर्व मुंबई आणि देशाने बघितले. देशभरात तो व्हिडिओ व्हायरल झाला. त्याला कोणीही चॅलेंज देऊ शकत नाही. तरीही आज त्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यात त्या महिलेने माझा विनयभंग झाला नसल्याचे म्हटले आहे. ही शिवसेना आणि भाजपाची दादागिरी आहे. त्यांनी त्या महिलेवर दबाव टाकला आहे. बहुतेक तिला मारण्याची धमकी दिली असेल. ही घटना घडली त्यावेळी माझे पदाधिकारी त्या महिलेला भेटायला गेले होते. तेव्हा त्या महिलेला भेटायला दिलेले नाही. तिला बाहेरही येऊ दिलेले नाही, असे मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अजंता यादव यांनी सांगतले. आज महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापौर हे मुंबईचे प्रथम नागरिक आहेत. त्यांना महिलेचा हात पकडून पिरगळताना लाज कशी वाटली नाही? त्यांना महिलेशी कसे वागावे कसे बोलावे हे कळत नाही का? असे प्रश्न यादव यांनी उपस्थित केले. जो पर्यंत महापौरांवर कारवाई होत नाही, तो पर्यंत आमचे आंदोलन सुरु राहील, असा इशारा यादव यांनी दिला.